बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात, 'घाईमध्ये...'

Raj Thackeray absent in Narendra Modi Shapathvidhi: पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली.

Pravin Dabholkar | Updated: Jun 11, 2024, 03:01 PM IST
बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात, 'घाईमध्ये...' title=
Raj Thackeray on Modi Oath Ceremony

Raj Thackeray absent in Narendra Modi Oath Ceremonyदेशात एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी देशविदेशातील नेते उपस्थित होते. एनडीएतील नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. असे असताना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली. पण याचं कारण समोर आलंय. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. महायुतीच्या नेत्यांसाठी त्यांनी जाहीर सभादेखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते, त्यामुळे ते जिंकून आल्याचा दावाही मनसैनिकांनी केला. निकाल लागला. एनडीएला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला. यात देशभरातील व्यावसायिकांसह, बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील दिसले. दरम्यान राज ठाकरेंना या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते. 

'घाईमध्ये निमंत्रण द्यायचं राहिलं'

शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नसणं चर्चेचा विषय झालाय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान घाईमध्ये निमंत्रण द्यायचं राहिलं असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. 

मनसेकडूनही प्रतिक्रिया 

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवलं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता, असे ते म्हणाले. महायुतीला आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते. आम्हाला निमंत्रण असतं तर ते कळलं असतं. मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आम्हाला आमंत्रण देण्यात विसरले असावेत, असे महाजन म्हणाले. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपामध्ये संपली आहे. गरज असेल तेव्हा उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही? हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही ते म्हणाले. एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. मनसे पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणे अपेक्षित नसल्याचे महाजन म्हणाले.