Raj Thackeray Rally : राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा

राज ठाकरे यांच्या सभेला अनेक पक्षांनी विरोध केला आहे. पण पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे.

Updated: Apr 29, 2022, 08:09 PM IST
Raj Thackeray Rally : राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा title=

औरंगाबाद : राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीनं दिला आहे. पोलिसांनी सभेसाठी 16 अटी घालून दिल्या आहेत. त्याचं उल्लंघन झाल्यास घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे. संपूर्ण राज्यातून भीम आर्मीचे कार्यकर्ते सभेसाठी औरंगाबादला जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने 16 अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचं उल्लंघन ठाकरेंकडून सभेत झालं तर या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा भीम आर्मीने दिलाय . संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला जाणार असल्याच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे. योग्य ठिकाणी दाद मागा, असं खडसावत याचिकाकर्त्यांना कोर्टानं 1 लाखाचा दंड ठोठावलाय. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका केली होती. परवानगी दिली तरी सभा लाईव्ह दाखवू नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. 

राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला पोलिसांनी काही अटी आणि शर्तींसह गुरुवारी परवानगी दिली. सांस्कृतिक मैदानावर मनसेकडून सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. तर पोलिसांचा ही मोठा फौजफाटा या सभेसाठी तैनात असणार आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला अनेक पक्षांनी विरोध केला होता. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये म्हणून अनेक नेत्यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. पण गुरुवारी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे. सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु आहे.