दूधकोंडी आंदोलन अखेर मागे, राजू शेट्टींची घोषणा

सरकार आणि दूध संघाच्या संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यात आला.

Updated: Jul 19, 2018, 10:28 PM IST
दूधकोंडी आंदोलन अखेर मागे, राजू शेट्टींची घोषणा title=

नागपूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर दूध दरवाढीसाठी पुकारलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. दूध उत्पादकांना 25 रूपये प्रतिलीटर दर देण्यासाठी दूध संघांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

तत्पूर्वी सरकार आणि दूध संघाच्या संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यात आला. या निर्णयानुसार सर्व दूधसंघ व संस्था आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर २५ रुपये खरेदीदर देणार आहेत. २१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी विश्रामगृहावर भेट घेतल्यानंतर शेट्टी यांनी आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतल्याने मुंबई, पुण्यासह राज्यभरात ओढवलेले दूधसंकट दूर झाले आहे. उद्यापासून दूध संकलन पूर्ववत होणार असल्याने दूधटंचाई दूर होणार आहे.

सरकारने घेतलेला निर्णय भविष्यातला एक दिर्घकालीन उपायोजनांचा भाग आहे. परराज्यातून आपल्याकडे येणारे दूध अनुदानित असते, या राज्यातील सरकारांच्या निर्णयाजवळ जाणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे, असे यावेळी शेट्टींनी सांगितले.