'सावरकरांनी दहा वर्षे तुरुंगवास भोगला, तुम्ही समाजकार्य तरी केलं का?'

रामदास फुटाणेंनी राहुल गांधींवर डागली तोफ 

Updated: Dec 15, 2019, 05:51 PM IST
'सावरकरांनी दहा वर्षे तुरुंगवास भोगला, तुम्ही समाजकार्य तरी केलं का?' title=
'सावरकरांनी दहा वर्षे तुरुंगवास भोगला, तुम्ही समाजकार्य तरी केलं का?'

पुणे : ज्येष्ठ साहित्यीक रामदास फुटाणे यांनी राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच स्तरांतून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत असताना आता फुटाणे यांनी राहुल गांधी यांना आत्मपरिक्षणाची गरज असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर मांडला आहे. 

आपल्या वागण्याबोलण्याच्या विसंगतीतील परिक्षण केलं जाणं गजेचं आहे, ही बाब फुटाणे यांनी स्पष्ट केली. 'राहुल गांधी यांनी एक विचार केला पाहिजे की, अनेक आक्रमणं होऊनही देशात जवळपास ८५ टक्के हिंदू आहेत. ते भावूक आहेत, भाविक आहेत. त्यामुळे उगाचच भांडणांना वाचा फोडून वातावरण दूषित करुन  देशाचा विकास होणार नाही. शिवाय ते अशी वक्तव्य करत राहिल्यास काँग्रेसचंही नुकसानच होणार', असा सूर फुटाणे यांनी आळवला. 

'आपल्याला चार लोकांनी शिकवलं तसंच न बोलता आपल्या वर्तणुकीमध्ये तारतम्य पाळलं पाहिजे', असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांची शाळा घेतली. जी गोष्ट चूक आहे ती चुकीचीच आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. एक साहित्यीक म्हणून समाजाकडे त्रयस्तपणे पाहून आपली भूमिका मांडली पाहिजे असं ते स्पष्टपणे म्हणाले. 

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

एखादं सत्य सांगण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसं करायला मी काही राहुल सावरकर नव्हे, तर राहुल गांधी आहे. माझ्याऐवजी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांनी देशाची माफी मागायला पाहिजे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत बचाओ आंदोलनादरम्यान केलं. याच निमित्ताने दिल्लीच्या राम-लीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.