Maharashtra Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ते लवकरच आपल्या पदाची शपथ घेतील. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पुन्हा एकदा भाजपने धक्कातंत्र वापरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे रमेश बैस यांची नियुक्ती आता होणार आहे.
रमेश बैस, यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर येथे झाला. रमेश बैस 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून ते 2019 पर्यंत रायपूरचे प्रतिनिधित्व करत राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. ते लोकसभेतील भाजपचे चीफ व्हिपही होते. 2019 मध्ये, भाजपने 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधारावर लोकसभेचे तिकीट दिले नाही, परंतु त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना जुलै 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले होते. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांनी त्रिपुराचंही राज्यपालपद भूषवले आहे.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
त्याआधी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या या बड्या नेत्याचे राजकीय पुनवर्सन करण्याचा हालचाली सुरु झाल्या होत्या. यानंतर आता जर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरु झाली होती. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत होती. मात्र, त्यांच्या ऐवजी रमेश बैस यांना संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच याशिवाय डझनभर राज्यांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथूर यांचाही राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थानचे मजबूत नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.