Ram Navmi 2024: महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यामध्ये अनेक प्रार्थनास्थळं, मंदिरं यांचाही समावेश आहे. यातील काही मंदिरांच्या अख्यायिका आपल्याला आवाक करणाऱ्या असतात. असंच एक मंदिर महाराष्ट्रात आहे जे कृष्णा नदीच्या मधोमध उभं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर ज्या बेटावर आहे ते हनुमानाने आपल्या हाताने पूर रोखल्याने तयार झालं आहे. याच मंदिराच्या शेजारी असणाऱ्या शिरटे गावात सीतामातेंनी वास्तव्य केलं आहे. रामनवमी निमित्त सांगलीतील बहे येथे असणाऱ्या या अनोख्या मंदिराबद्दल आज जाणून घेऊयात.
कृष्णा नदीचा काठ अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच कृष्णा नदीच्या काठी हे रामलिंग बेट आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बहे गावात हे रामलिंग बेट वसलेलं आहे. नदीच्या मधोमध आजुबाजूला हिरव्यागार परिसरात वसलेलं हे बेट फारच नयनरम्य आहे. तुम्ही मंदिरात असता तेव्हा दोन्ही बाजूंनी नदीचा प्रवाह वाहत असतो.
या बेटावर प्रभू श्रीरामांचं प्राचीन मंदिर आहे. यासह अनेक छोटी मंदिरं आहेत. मंदिराच्या गाभऱ्यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. तसंच मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे. याशिवाय मध्यभागी शिवलिंग आहे.
अख्यायिका अशी आहे की, प्रभू श्रीरामचंद्रांनी हे शिवलिंग स्थापन केलं आहे. असं म्हणतात की, प्रभू रामचंद्र आपल्या 14 वर्षांचा वनवास संपवून लंकेवरुन परतत असताना येथे थांबले होते. यावेळी सीतामाता शेजारीच असणाऱ्या शिरटे गावात वास्तव्यास होत्या. येथे थांबलल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वाळूचं शिवलिंग स्थापन केलं आणि त्याची पूजा करु लागले.
प्रभू श्रीराम पूजा करत असताना कृष्णामाईला महापूर आला. हनुमान यावेळी रामाच्या मागेच उभे होते. त्यांनी महापूर येत असल्याचं पाहिल्यानंतर आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि आपोआपच बेट तयार झालं. याच कारणामुळे गावाचं नाव 'बाहे' असं पडल्याचं सांगितलं जातं. पण नंतर ते 'बहे' झालं.
मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरुन तुम्हाला जावं लागेल. इस्लामपूर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या बेटावर जाण्यासाठी तुम्ही गाडीने जाऊ शकता. पण तुम्हाला मुख्य रस्त्यावर दुचाकी, चारचाकी पार्क करावी लागते. यानंतर बेटापर्यंत उभारण्यात आलेल्या पुलावरुन चालत जावं लागतं.