नवी दिल्ली : राज्यात दूध आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का ? याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. त्यावर आता भाजपने शिवसेनेला चिमटा काढलाय. उद्धव ठाकरे सर्वच पातळीवर नापास झाल्याचा दावा अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलायं. राज्याचं सरकार नापास झाल्याचे ते म्हणाले.
निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्या जाणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलायं. हवं तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन अयोध्येत जावं. भगवान रामांसाठी मानपान कसला आलाय. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धवजींचे आता पहले सरकार फिर मंदिर असं वर्तन असल्याचे दानवे म्हणाले.
दूध प्रश्न मिटवण्यात राज्याला अपयश आलय. भाजपच्या आंदोलनामुळे आत्ता राज्य सरकार बैठका घेतंय. राज्यानं वेळीच लक्ष द्यायला पाहीजे होते असे दानवे म्हणाले. राजू शेट्टी आत्ताच आंदोलन का करत आहेत. राजू शेट्टींना आमदारकीसाठी पवारांकडे जावं लागत असल्याची टीकाही दानवेंनी केली.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.