जगण्यासाठी झुंजत असलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू; 40 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी

Maharashtra News : दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र समुद्रात सोडल्यानंतर हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले आणि त्याचा मृत्यू झाला.

आकाश नेटके | Updated: Nov 16, 2023, 09:03 AM IST
जगण्यासाठी झुंजत असलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू; 40 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया,  रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाचा (Baby Whale Fish) अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत जवळपास पाच वेळा रेस्क्यूचे प्रयत्न केल्यांतर या 30 फुटी व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यात आलं होतं. मात्र 15 नोव्हेंबरला संध्याकाळी ते पुन्हासमुद्रकिनारी आलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माशाला जीवनदान देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरु होते. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

तब्बल 40 तास रेस्क्यू ऑपरेशन करून गणपतीपुळेच्या समुद्रात सोडण्यात आलेले व्हेल माशाचे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले होते. बराच वेळ ते पाण्याबाहेर राहिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. व्हेल माशाला जिवंत समुद्रात सोडण्याचं देशातील हे पहिलंच रेस्क्यू ऑपरेशन होतं. तब्बल दोन दिवस हे बाचवाकार्य सुरु होतं. रात्री उशिरा व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सुखरुप सोडण्यात आलं. मात्र पुन्हा ते समुद्रकिनारी आले होते. अखेर त्याचा समुद्रकिनारी मृत्यू झाला आहे.

13 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास हे व्हेल माशाचे पिल्लू गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर आलं होतं. त्यानंतर स्थानिकांसह प्रशासनाने व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न सुरु केला होता. 30 फूट लांबी आणि सुमारे चार टन वजन असलेल्या या व्हेल माशाच्या पिल्लाला 13 नोव्हेंबर रोजी जवळपास तीन वेळा समुद्रात सोडलं गेलं होतं. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा'ऑपरेशन व्हेल' सुरू करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सुखरुप सोडले. मात्र, बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी आला. मात्र यावेळी अखेर त्याचा मृत्यू झाला.