Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) मतदानाच्या प्रचाराची सांगता आज झाली. राज्यातील हायप्रोफाईल सीट मानल्या जाणाऱ्या बारामतीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दोन्हीही पवार गटाच्या सांगता सभा आज बारामतीत (Baramati News) पार पडली. त्यावेळी जोरदार टीका देखील एकमेकांवर करण्यात आली. अशातच बारामतीच्या सभेत रोहित पवार (Rohit Pawar) यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावर बोलताना अजित पवारांनी थेट रोहित पवारांची नक्कल केली अन् घणाघाती टीका केली.
रोहित पवार काय म्हणाले?
मी आणि आमचे कार्यकर्ते जेव्हा साहेबांसोबत बसलो होतो. तेव्हा पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं, काही काळजी करू नका. आपल्याला स्वभिमानी महाराष्ट्रासाठी नवी पिढी तयार करायचीये. तोपर्यंत नवी पिढी तयार होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. हा किस्सा सांगताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. साहेब मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं.. कृपा करून असं पुन्हा म्हणू नका, तुम्ही आमचा जीव आहात. तुम्ही आमचा आत्मा आहात. आम्ही स्वार्थासाठी लढत नाही. मला सुद्धा मंत्रीपदाची संधी मिळाली असती, पण अनेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही सत्तेसाठी तुमच्यासोबत नाहीये. आम्ही स्वभामिनासाठी, तुमच्या शब्दासाठी इथं आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचं प्रत्युत्तर
मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं... शेवटच्या सभेत कोणीतरी भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न करेल. आमच्या एका पठ्ठ्यानं आज डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. हे मी करतो, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली. ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाही. तुम्ही कामं दाखवला. रडीचा डाव इथं चालणार नाही. तुम्हाला हडपसरमधून उभा रहायचं होतं. तुम्हाला आम्ही राजकारणाचं बाळकडू पाजलंय. तुम्ही आमच्यावर टीका करता. तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे आम्ही पाहिलेत, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता झाली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षफुटीचा अनुभव सांगितला. शरद पवार काय म्हणाले हे सांगत असताना रोहित पवार भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. रोहित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी जोरदार भाषणं केली. त्यावेळी अख्खं पवार कुटूंब सुप्रिया सुळे यांच्यासाठी एकवटल्याचं दिसून आलंय. बारामतीत तगडी फाईट होणार असल्याने आता वारं कोणत्या दिशेने फिरणार? यावर देखील चर्चा होताना दिसत आहे.