मुलं पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवांनी नांदेड जिल्ह्यात दहशत

मुलं पळवून नेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या अफवांचं पेव सध्या फुटलं आहे. या अफवांमुळे निरअपराध लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. 

Updated: Jun 8, 2018, 06:40 PM IST
मुलं पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवांनी नांदेड जिल्ह्यात दहशत title=

नांदेड : मुलं पळवून नेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या अफवांचं पेव सध्या फुटलं आहे. या अफवांमुळे निरअपराध लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. बुधवारी अशीच एक घटना नांदेड शहरात घडली. मुलं पळवून नेणाऱ्या टोळीतला समजून सुमारे शंभर ते सव्वाशेच्या जमावानं एका इसमाला बेदम मारहाण केली. यावेळी विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं पुढचा अनर्थ टळला. विशेष म्हणजे या अफवांमुळे भंगार वेचणारे, कचारा गोळा करणारे अशा लोकांना जमावाकडून बेदम मारहाण होत असल्याच्या घटना शहरात घडत आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यात किंवा शहरात मुलं पळवणारी अशी कोणतीही टोळी नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं  आवाहन, पोलिसांनी केलं आहे. 

मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीच्या अफवांनी नांदेड जिल्ह्यात दहशत पसरवलीय. टोळी असल्याच्या संशयावरुन मारहाणीच्या घटना जिल्ह्यात घडल्यात. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. सावधान मुलं पळवणारी टोळी आलीय. अशाच आशयाचे एक ना अनेक मेसेज सध्या नांदेडमध्ये फेसबुक आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून व्हायरल होतायत. या मेसेजमुळेच सध्या नांदेडमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. विशेषतः ग्रामीण भागात अशा अफवांचे अधिक पेव फुटलंय. त्यामुळे ग्रामीण भागातले नागरिक रात्र जागून काढतायत.

मुलं पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना समोर आल्यात. भिकारी, भंगार वेचणारे आणि परप्रांतियांना संतप्त जमावाकडून मारहाण झालीय. मात्र पोलीस तात्काळ पोहचल्याने अनर्थ टळला. दरम्यान जिल्ह्यात मुलांना पळवून नेण्याची किंवा अपहरणाची एकही घटना जिल्ह्यात झाली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय.