पप्पा मला वाचवा... मुलीचा फोन आला आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला

मुलीची हार्त हाक ऐकून आई-वडिल हादरले आहेत, आपल्या मुलीला वाचवा अशी एकच विनंती ते करतायत  

Updated: Mar 3, 2022, 07:29 PM IST
पप्पा मला वाचवा... मुलीचा फोन आला आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला title=

नवी मुंबई :  युक्रेनमध्ये (Ukrain) अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Student) अडकले आहेत. भारतीय दूतवासाने (Indian Embassy) सूचना जारी करत कोणत्याही परिस्थितीत कीव्ह आणि खारकिव्ह (Kharkiv) सोडण्याचा सल्ला दिला आहे. रोमानियातील बुखारेस्ट इथल्या युद्ध शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आश्रय घेतला आहे.

नवी मुंबईत राहणारी दक्षा कानडे ही विद्यार्थिनी अजूनही खारकिव्हमध्ये अडकली आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथे राहणारी दक्षा कानडे खारकीव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेतेय. पण आता खारकीव्हमध्ये परिस्थिती पूर्ण बिघडली आहे. रशियन सैन्याने खारकिव्हवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत.

अशा युद्धजन्य परिस्थितीत दक्षा आणि तिच्याबरोबर 500 हून अधिक भारतीय विद्यार्थी खारकिव्हमध्ये अडकले आहेत. यात मुंबई, कल्याण आणि नवी मुंबईतले सात विद्यार्थी आहेत. हे सर्व बुधवारी 25 किलोमीटर पायी चालत खारकीव्ह रेल्वे स्टेशनवर पोहचले. पण गर्दीमुळे त्यांना ट्रेनमध्ये चढता आलं नाही.

त्यातच गोळीबार आणि बॉम्बहल्लांमुळे एकच पळापळ झाली. घाबरलेल्या दक्षाने वडिलांना फोन करत पप्पा मला वाचवा अशी आर्त हाक दिली. मुलीच्या फोनने आईवडिलांचा काळजाचा ठोका चुकला. 

दक्षाच्या वडिलांनी भारत सरकारला विनंती करत दक्षासह तिथे अडकलेल्या इतर भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्याची विनंती केली. सध्या या पिसोचीन इथं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पण इथून पोलंड आणि हंगेरिया या देशांच्या सीमा हजार किलोमीटरवर आहेत. तर रशिया १०० किलोमीटवर आहे. त्यामुळे रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना मदत करावी अशी अपेक्षा दक्षाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.