अहमदनगर : Sai Baba's Kakad Aarti without Bhonga : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आंदोलनाची हाक दिली. राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. भोंग्याविना अनेक ठिकाणी अजान झाली. या आंदोलनामुळे फक्त मशिदीवरीलच भोंगे बंद झाले असं नाही तर मंदिरावरील भोंगे सुद्धा बंद झाले आहे. शिर्डीत रोज साईबाबा मंदिरात पहाटेची काकड आरती होत असते. ही काकड आरती अनेकांना भोंग्याद्वारे ऐकू येते. मात्र सलग दोन दिवस भोंग्याविनाच आरती झाली.
गुढीपाडव्याचं राज ठाकरे यांचे भाषण, ठाण्याची सभा आणि औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावर लक्ष केंद्रीत करत आंदोलनाची हाक दिली. भोंगे उतरले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. प्रशासनाने मंदिर आणि मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. अनेक ठिकाणी भोंगे वाजले नाहीत. संपूर्ण राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच शिर्डीतील साई मंदिरात भोंग्याविना काकड आरती झाली. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने सर्वच धार्मिकस्थळांना सूचना दिल्या. या सूचनेनुसार मशिदीसोबत मंदिरांवरील भोंग्यावर सुद्धा कारवाई झाली. शिर्डी मंदिर प्रशासनालासुद्धा जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या. सूचनेचं पालन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं. मंदिरावरील भोंगा बंद करण्यात आलाय.
त्यामुळं सलग दोन दिवसांपासून शिर्डीकरांना आरतीचे स्वर काही कानावर पडलेले नाहीत. शिर्डीत साईंची काकड आरती लाऊडस्पीकरविना झाली. कारण वेळेच्या बंधनामुळे साई संस्थानने हा निर्णय घेतला. सूचनेनुसार मंदिरावर लावलेले लाऊडस्पीकर बंद केले. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दोन दिवसांपासून लाऊडस्पीकरविना आरती होत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांवर आक्षेप घेत मोठ्या आवाजात अजान घेण्याला विरोध केला होता. यावर प्रशासनानं मंदिर-मशिदीवर असलेल्या भोग्यांच्या परवानगी आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोग्यांच्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं आहे.
दरम्यान, मुस्लीम समुदायाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरुन होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणी शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून करण्यात आली आहे. भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु करावी. शिर्डीतून राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरु करावी, असे निवेदन जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आले.