महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली? नेमकं म्हणाले तरी काय?

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची जीभ चांगलीच घसरली. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. 

Updated: Jul 31, 2023, 09:35 PM IST
महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली? नेमकं म्हणाले तरी काय?  title=

Sambhaji Bhide Controversial Statement : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. संभाजी भिडे आणि वादांची मालिका सुरूच आहे. संभाजी भिडेंनी अलिकडेच बडनेरामध्ये केलेल्या भाषणात एकाहून एक वादग्रस्त वक्तव्य केलीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली. त्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. 

संभाजी भिडेंची आक्षेपार्ह वक्तव्यं 

साईबाबांना हिंदूंचा देव मानू नका, देव्हा-यातून बाहेर फेका, असं आवाहन त्यांनी भाषणात केलं. इंग्रजांनी भारतात सुधारक नावाची जात पैदा केली. त्यात महाराष्ट्रातून महात्मा फुलेंचा समावेश होता, असा आक्षेपार्ह दावा भिडेंनी केला. एवढ्यावरत ते थांबले नाहीत तर महात्मा गांधींचे वडील मुसलमान होते. असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केलं. 

भिडे यांच्या या आक्षेपार्ह भाषणाची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल

भिडे यांच्या या आक्षेपार्ह भाषणाची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. तब्बल तीन तासांच्या या भाषणात भिडेंनी जागोजागी महापुरुषांना उद्देशून शिव्याही दिल्यात. या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. भिडेंच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. भिडेंना अटक करण्याची मागणी केली जात आहे.  तर भिडेंचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी बजावलंय.

इतिहासाची तोडमोड करून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्यं करता कामा नयेत. संभाजी भिडेंमुळं सभ्यतेची पातळी देखील खाली घसरलीय. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात भिडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. आता त्यांच्यावर अटकेची कारवाई सरकार करणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागल आहे.

ठाण्यात संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

ठाण्यात संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या दबावानांतर नौपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मणीपूरवरून लक्ष विचलित करण्यासाठी भिडेंना पुढे करण्याता आल्याचा आरोप यावेळी आव्हाडांनी केला. तसंच भिडेंना अटक झाली नाही तर ठाण्यात आंदोलन पेटणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

 साईबाबांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शिर्डीतील ग्रामस्थ आक्रमक

 शिर्डीत  संभाजी भिडे यांनी साईबाबांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत. वारंवार संभाजी भिडे साईबाबांवर अत्यंत खालच्या शब्दात वक्तव्य करत असल्याने ग्रामस्थांनी साई संस्थानला भिडे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलिसांना निवेदन दिले.