विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) असणाऱ्या एका तरुणाने गळफास घेत आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार संभीजनगरच्या (Sambhaji nagar) जवाहर नगर परिसरात समोर आला आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहीली होती. तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या खिशात ही चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये तरुणाने प्रेयसीसाठी संदेश लिहीत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या मुकेश नागोराव गाव्हदे या (30) वर्षीय तरुणाने पत्राच्या घरात लोखंडी पाईपाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलाय. मुकेशने प्रेयसीचे दुसऱ्यावर प्रेम असल्याच्या संशयातून गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जवाहरनगर परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला आहे. मुकेश मूळचा बुलडाणा तालुक्यातील चोंडी गावचा रहिवासी होता. तो शहरात केटरिंगच्या व्यवसायामध्ये काम करत होता. या दरम्यान त्याची एका तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. यानंतर दोघेही बालाजीनगरमध्ये एकाच खोली राहू लागले.
मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद सुरु झाले. शनिवारी दुपारी घरात एकटे असताना मुकेशने लोखंडी पाईपला गळफास लावला आणि आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मुकेशच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली असून त्याने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काय लिहीलय या चिठ्ठीत?
मुकेशच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत, 'तू जो भी पायला असेल त्याच्या सोबत खूश रहा मी तुला कधी श्राप देणार नाही पिल्लु I love you.. sorry' असा मजकूर लिहीलेला होता.