छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर... राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंचं ट्वीट

 राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

Updated: Jun 4, 2021, 11:41 AM IST
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर... राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंचं ट्वीट title=

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याचा आरोप केंद्र सरकारवर करत आहेत. तर महाविकास आघाडीमुळे आरक्षण टिकलं नाही असा आरोप भाजप करत आहे. शिवाय मराठा आरक्षणाप्रकरणी आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील भाजपने दिला आहे. पण कोरोना काळात आंदोलन करण्यास संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. शिवाय संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार निलेश राणे आणि चंद्रकांत दाद पाटील यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. 

नारायण राणे यांनी देखील संभाजीराजेंवर टीका केली, 'संभाजीराजे यांची खासदारकीची मुदत संपायला आहे.  त्यामुळे ते जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. पण जनता त्यांच्या बाजूने आहे का?' असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. राणेंच्या या टीकेला संभाजीराजे यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं. 

संभाजीराजे ट्विट करत म्हणाले, 'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.' पण यावेळी संभाजीराजे यांनी  कोणाचंही नाव घेता राणेंना बोल्ले असतील, असं सांगितलं जात आहे.