दिनेश दुखंडे झी मीडिया, भिवंडी-शहापूर : समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.
स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे लोटली तरी गाव खेड्यात पोचायला पक्क्या रस्त्यांचा पत्ता नाही आणि सरकार निघालंय समृद्धी महामार्ग बांधायला...
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीतलं चिराट पाडा गाव... अवघी १५०० च्या आसपास लोकसंख्या... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गात हे गाव येतं... त्यामुळे भू संपादनासाठी इथं प्रयत्न सुरु आहेत. पण ग्रामस्थांचा सरकारच्या पुनर्वसनावर विश्वास नाही... कारण १९७८ साली मुंबई महापालिकेच्या पिसे पांजरापोळ धरणासाठी गावातल्या शेतकऱ्यांची जमीन घेतली गेली...पण त्याचा कुठलाच मोबदला मिळाला नाही...ना कुठलं पुनर्वसन झालं... त्यामुळे इथलं कुणी ही सरकारला जमीन द्यायला तयार नाही...
याच गावातल्या संतोष धमने या शेतकऱ्याचं तर अख्ख कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे... कारण त्याची शेतजमीनही जातेय आणि घरही... गावकरी सांगतात जमीन मोजणीची ना कसली नोटीस ना कल्पना... जमीन देत नाही म्हटल्यावर सरकारी अधिकारी पोलीस फौजफाटा घेऊन गावात घुसले आणि मोजणीला विरोध केला म्हणून गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत.
जी परिस्थिती चिराट पाडा गावातली, तशीच शहापूरमधल्या शेई गावाचीही....इथंही जमिनीला मिळणाऱ्या दरावरून वाद सुरू आहे... प्रशासकीय अधिकारी गावा-गावांमध्ये जमिनीच्या दरांबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातली २५ हेक्टर शासकीय, वनखात्याची २२७ हेक्टर तर ५०४ हेक्टर खाजगी जमीन लागणार आहे.
त्यासाठी फक्त शहापूरमध्ये ३६० हेक्टर आणि भिवंडीत २२ हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार गेल्या जुलै महिन्यांपासून आतापर्यंत थेट खरेदीच्या माध्यमातून शहापूर मध्ये २४० हेक्टर भूसंपादन झालंय... तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात सुमारे ४७ टक्के भूसंपादन झाल्याचा दावा प्रशासकीय अधिकारी करत आहेत.
पण वादग्रस्त चिराट पाडा आणि शेई गावांतलं भूसंपादन करता आलेलं नाही... पण प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधितांवर सध्या पैशांचा पाऊस पडतोय, अशीही अनेक उदाहरणं पाहायला मिळतात....जमिनीच्या मोबदल्यात काही लाखांपासून कोटींपर्यंत रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत... पण हे क्षणिक ऐश्वर्य इथं या अगोदरही उपभोगलं गेलंय... याआधीही रस्त्यासंदर्भातल्या अनेक प्रकल्पात जमिनी गेल्या, पैसा मिळाला. काही जणांनी त्याचा योग्य विनियोग केला, पण अनेक जण पैसा संपल्यानंतर देशोधडीला लागले.