कोरोना संकट । ५१ शेतमजूर महिलांची सामाजिक बांधिलकी, मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत

 सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील ५१ शेतमजूर महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला एक दिवसाची मजुरी दिली आहे. 

Updated: Apr 29, 2020, 11:13 AM IST
कोरोना संकट । ५१ शेतमजूर महिलांची सामाजिक बांधिलकी, मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत title=
संग्रहित छाया

सांगली : काही शेतमजूर दुसऱ्याच्या शेतामध्ये मिळेल ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. तर काहीं लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीत त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत केली आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील ५१ शेतमजूर महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला एक दिवसाची मजुरी दिली आहे. 

पोटाची खळगी भरण्यासाठी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत केली आहे. भिलवडी येथील या शेतमजूर महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला एक दिवसाचा पगार अर्थात ६ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

 सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील साठे नगर मध्ये बहुतांशी मजूर वर्ग राहतो. नोकरीला असणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. काही जणांची स्वतःची शेती अत्यल्प आहे. तर काहीजण भूमीहीन आहेत. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न देखील तोकडेच आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

नैसर्गिक आपत्ती वेळी इतरांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची अपेक्षा करणाऱ्या साठे नगर येथील मागासवर्गीय वस्तीतील, शेतमजूर  ५१ महिलांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस आपला एक दिवसाचा पगार दिला आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असून, त्यांनी इतर सामाजिक संघटना , विविध मंडळे यांच्यापुढे एक आदर्श ठेवला आहे. भिलवडी सारख्या ग्रामीण भागातून मुख्यमंत्री सहायता निधीस शेतमजूर महिलांनी केलेली मदत ही खरच अनमोल आहे, अशी कौतुकाची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.