तिहेरी हत्याकांडानं सांगली हादरलं, तिघांना धारदार शस्त्राने वार करून संपवलं

सांगलीमध्ये तिहेरी हत्याकांड, धारधारस्त्राने वार करुन एकाच वेळी तिघांना संपवलं

Updated: Aug 1, 2021, 07:45 PM IST
तिहेरी हत्याकांडानं सांगली हादरलं, तिघांना धारदार शस्त्राने वार करून संपवलं

मुंबई: तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद झाला आणि तो टोकाला पोहोचला. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आली आहे. तर या वादात चार जण अद्यापही जखमी आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगली पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. 

सांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथील वसंतनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धारधार शस्त्राने वार करुन एकाच वेळी तिघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी मृत व्यक्तींची नावं आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये तरुणीवरून वाद सुरू होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही गेलं होतं. या दोन्ही गटांच्या वादात पोलिसांनी मध्यस्ती करून वाद सोडवला देखील होता. मात्र पुन्हा वाद झाल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. 

मृत्युमुखी झालेल्यांच्या संबंधीत एका मुलीवर अत्याचार झाला होता, त्याविषयी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा राग मनात ठेवून दोन गटात वाद सुरू होता. पोलिसांनी हा वाद याआधी मिटवला होता. मात्र तरीही पूर्ववैमनस्यातून शनिवारी रात्रीही वाद झाला. 

विजय मोहिते, हिम्मत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी येऊन हल्ला केला. या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते यांचा खुन झाला असून यात अन्य चार जण जखमी आहेत. हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.