Sanjay Raut: हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललंय. जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून घटनाबाह्य पद्धतीने देशामध्ये एका प्रकारची आग लावली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं आणि आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे. केअरटेकर गव्हर्मेंट हेदेखील संविधानाच्या विरोधात असल्याचे राऊत म्हणाले. 26 तारखेला विधानसभेची मुदत संपलेली आहे. नवीन विधानसभा, नवीन सरकार अस्तित्वात येणे हे घटनेनुसार आवश्यक होतं. त्यांचे भाडोत्री पंडित काहीही कागदपत्र आणून दाखवतील. आम्ही जर असतो तर एवढ्याला राष्ट्रपती लागवड लावली असती, असे ते म्हणाले. अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून 10 दिवस होऊन गेले. एवढ बहुमत आहे तर सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. अद्याप कोणीही सरकार स्थापनेच्या दावा का केला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.
मुख्यमंत्री कोण? भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले. राज्यपालांना कोणी भेटले नाहीत. सरकार स्थापनेसाठी राज्यपाल हे चालू देत आहेत. काळजीवाहू सरकार सरकार घटनाबाह्य आहे. पक्षाचे प्रांत अध्यक्ष सांगताहेत 5 तारखेला शपथविधी होणार, हे काय राज्यपाल आहेत का? यांना राज्यपालांचे अधिकार दिले आहेत का? राज्यपालांनी सांगितलं आहे का? राज्यपालांना यांनी कळविले आहे का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला तयार नाहीत. घाबरले आहात का? असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले.
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या फोटोवरुन शिंदेंना टोला लगावला. ते आजारी आहेत. त्यांच्याविषयी तुम्ही काही वेड वाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. हाताला पट्टी लावून बसले आहेत. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले. त्या मंत्र्यांना देखील ते भेटले नाहीत. म्हणजे त्यांची तब्येत किती खराब आहे बघा. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला असं डिस्टर्ब करू नका. 5 तारखेला शपथविधीला येताहेत की एअर ॲम्बुलन्समधून त्यांना यावं लागेल? अशा चिंतेत अनेक लोक असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असे मी वृत्तपत्रात वाचलं. त्यांना डॉक्टरांची गरज आहे का मांत्रिकांची गरज आहे? त्यांना बरं करण्यासाठी मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत? त्यांच्या अंगातली जी भूत संचारली आहेत ती आता उतरवायला पाहिजे ते काम जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर ती आनंदाची गोष्ट असल्याचे राऊत म्हणाला.
केंद्रात, लोकसभा, राज्यसभा, संसदेत प्रश्न विचारले जाऊ देत नाही. आम्ही एखादा प्रश्न विचारला की संसद बरखास्त करून पाच मिनिटात लोकसभा स्पीकर आणि राज्यसभा चेअरमन निघून जातात. इतकं बहुमत यांच्याकडे आहे की हे उद्या विधानसभेचा अधिवेशनदेखील घेणार नाहीत, असे राऊत म्हणाले. हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्यावर त्यांच्या प्रांगणात घेतील. विरोधी पक्षाला संपवून टाकायच. लोकशाही टिकवायचे नाही अशा पद्धतीचा राज्य या महाराष्ट्रात चालू असल्याचे ते म्हणाले.