उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा 'मिले सूर मेरा तुम्हारा'

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता 'मिले सूर मेरा तुम्हारा' सुरू झालं आहे.

Updated: Jan 27, 2019, 05:03 PM IST
उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा 'मिले सूर मेरा तुम्हारा' title=

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता 'मिले सूर मेरा तुम्हारा' सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर साताऱ्यातल्या दोन्ही राजांचं शनिवारी मनोमिलन झालं. पवारांसोबत दोन्ही राजे काल एकाच गाडीतून कार्यक्रमाला पोहोचले. त्यानंतर आज पुन्हा एकदा दोघांचे सूर जुळल्याचं चित्र दिसलं.

रविवारी भल्या पहाटे सातारा हिल मॅरेथनॉच्या वतीनं उभारण्यात आलेल्या रनर्स पॉईंटच्या उद्घाटनासाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले एकत्र आले होते. त्यावेळी आयोजकांनी दोघांनाही धावण्याची विनंती केली. त्यावर तुम्ही सगळे मिळून एवढं पळवताय की, पळायची हौसच फिटलीय, असं उत्तर उदयनराजेंनी आपल्या खास दिलखुलास अंदाजात दिलं. आणि तिथं चांगलाच हशा पिकला.

दोन्ही राजे-पवार एकाच गाडीत

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही साताऱ्यात राजकीय चमत्कार पाहायला मिळाला. हा चमत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.  खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातलं वैर सर्वांनाच माहित आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही, मात्र या दोघांना सोबत आणण्याची किमया शरद पवारांनी घडवली.

ज्यांच्यामधून विस्तवही जात नव्हता असे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले. राजघराण्यातील दोघे भाऊ, पण एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी. सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांच्याता वादाची ठिणगी पडली आणि हा वाद कायमच धुमसत राहिला. मग कधी टोनाक्याचं व्यवस्थापन असो किंवा दारुचं दुकान हटवण्याचा वाद असो. दोन्ही बंधूराजे एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं अनेकवेळा तणावाचे प्रसंग निर्माण झाले.

अलिकडेच कुडाळमधल्या मंदिरातील कार्यक्रमाच्या ठिकाणी हे दोघेही आमनेसामने आले, तेव्हा त्यांच्यात रंगलेला मिश्किल सामना सगळ्यांनी पाहिला. खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला. तेव्हा 'माझा खांदा का दाबताय', असा सवाल शिवेंद्रराजेंनी केला. त्यावर फिटनेस चेक करतोय, असं मिश्कील उत्तर उदयनराजेंनी दिलं. तेव्हा माझा फिटनेस कायमच चांगला आहे, प्रात्यक्षिक दाखवू का, असा मार्मिक टोला शिवेंद्रराजेंनी लगावला.

पण शनिवारी सातारकरांना चक्क राजकीय चमत्कार पाहायला मिळाला आणि हा चमत्कार घडवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्याला आले होते. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले तेच मुळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेऊन.

एकाच गाडीतून या तिघांना एकत्र उतरताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे शिवेंद्रराजे भोसले हे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्यासोबत शरद पवार पुढच्या सीटवर बसले होते. तर उदयनराजे मधल्या सीटवर होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोघा बंधूराजांमधील वाद मिटावा, यासाठी पवारांनी स्वतः मध्यस्थी केल्याचं स्पष्ट झालं आहे.

साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी पुन्हा खासदार उदयनराजेंना मिळणार, अशी बातमी झी २४ तासनं दिली होती. आजच्या भेटीमुळं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता दोन्ही राजांमध्ये खरंच मनोमिलन झालंय की ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे, हे निवडणुकीत कळेलच, कारण घोडा मैदाना आता फार दूर नाही.