सावित्री नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, महाडसाठी धोक्याची घंटा

सावित्री नदीची धोक्याची पातळी 6.50 मीटर असून सध्याची पाणी पातळी 7.20 मीटर इतकी आहे.

Updated: Jul 23, 2021, 09:39 PM IST
सावित्री नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, महाडसाठी धोक्याची घंटा

रायगड : महाड भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये ही जोरदार पाऊस सुरु आहे. सावित्री नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीची धोक्याची पातळी 6.50 मीटर असून सध्याची पाणी पातळी 7.20 मीटर इतकी आहे.

महाडमध्ये 2 दिवसानंतर पाणी ओसरत असताना पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने महाडमध्ये पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिसत आहे.

महाड शहर आणि परिसरात वीज खंडित आहे. पिण्याचं पाणीही उपलब्ध होत नाहीये. महाडवासीयांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहेत.

दुसरीकडे पेण तालुक्यातील हेटवणे धरण भरले असून धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे 2 फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

1 जूनपासून आतापर्यंत 136 जणांचा पावसामुळे बळी गेला आहे. अजूनही ४५ जण बेपत्ता आहेत. पावसाचा आतापर्यंत २१ जिल्ह्यांना फटका बसला आहे. आतापर्यंत 4000 नागरिक सुरक्षित स्थळी हलविले गेले आहेत. राज्यात 6 ठिकाणी रिलीफ कॅम्प सुरू आहेत. 13 NDRF च्या तुकड्या तैनात असून १ तुकडी मार्गस्थ आहे. आर्मी, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या प्रत्येकी 2 टीम मदतकार्यात लागल्या आहेत.