अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच साधारण पाच महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जाऊ लागली. दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. त्यातच शिक्षण व्यवस्थेवरही या परिस्थितीमुळं काही मोठे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं असूनही कोरोनाचं संकट टळल्यामुळं शाळा काही अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. पण, येत्या काळात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यातून याचे संकेत मिळाले. शाळा अद्यापही सुरु झाल्या नसल्या, तरीही ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती, कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते असं मत त्यांनी मांडलं.
शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, ते सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत या संदर्भात पाच ते सहा वेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
सद्यस्थिती पाहता शैक्षणिक वर्षासाठीचं धोरण निश्चित झालं पाहिजे, सर्वांना १०० टक्के शिक्षक मिळालं पाहिजे याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षासाठीची उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून जानेवारी पासून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना दिली. कडू यांच्या या वक्तव्यामुळे आता जानेवारी महिन्यापासून शाळा सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.