ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

त्याबाबतचा निर्णयही होणार ... 

Updated: Sep 23, 2020, 01:27 PM IST
ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा असून, येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणाऱ्ये खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं ही बाबही तितकीच महत्त्वाची. 

 

सध्याच्या घडीला जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत खुद्द शरद पवार आणि अजित पवार बैठक घेत आहेत. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती असल्याचं कळत आहे.  

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला आहे. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळं ते अखेर पक्षातून काढता पाय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चेनं जोर धरला आहे.