धक्कादायक, नवी मुंबईत खासगी क्लासमध्ये कर्मचारी तरुणीवर लैंगिक अत्याचार

तरुणीवर त्याच क्लासेसमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Updated: Oct 18, 2019, 09:02 AM IST
धक्कादायक, नवी मुंबईत खासगी क्लासमध्ये कर्मचारी तरुणीवर लैंगिक अत्याचार title=
संग्रहित छाया

नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी क्लासेसमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर त्याच क्लासेसमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन याने अत्याचार केल्याचे या पिडितेने सांगितले असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊनही दीपेश जैन मोकाट आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला आहे. परंतु अटक करण्यात आली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तीदार यांनी सांगितले. 

या घटनेतील पिडीत तरुणी ही कोपरखैरणे भागात रहाण्यास असून ती वाशीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ही तरुणी ऑगस्ट महिन्यापासून नेरुळ येथील महेश टुटोरियल नामक खासगी क्लासेसमध्ये सुपरवायझर म्हणून पार्टटाईम काम करत होती. गत २२ सप्टेंबर रोजी पिडीत तरुणीला खारघर येथील क्लासेसमध्ये पाठविण्यात आले होते. तेथून सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पिडीत तरुणी घरी जाण्यासाठी निघाली असताना, क्लासेसमध्ये असलेल्या दीपेश जैन याने क्लासरुमचा दरवाजा आतून बंद करुन पिडीत तरुणीसोबत जबरदस्तीने अश्लिल चाळे केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

त्यावेळी पिडीत तरुणीने प्रतिकार करुन आरोपी दीपेश जैन याच्या तावडीतुन स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर पिडीत तरुणीने आपले घर गाठून घडल्या प्रकाराची माहिती क्लास व्यवस्थापनाला दिली. मात्र, पिडीत तरुणीच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. उलट अनुप शुक्ला या वरिष्ठाने पिडीत तरुणीला हॉटेलवर भेटण्यासाठी बोलावले. अखेर पिडीत तरुणीने मंगळवारी आपल्या आईसह खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दीपेश जैन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.