शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत

शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत 

Updated: Nov 5, 2019, 02:26 PM IST
शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत title=

मुंबई : शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संख्याबळाशिवाय दावा कसा करणार ? असा सवाल सोनिया गांधींनी कालच्या दिल्लीतल्या बैठकीत पवारांना केलाय. त्यामुळे काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचं पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र याबाबत आग्रही असल्याचे समजत आहे. त्यामुळे पुन्हा शरद पवार हे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

शिवसेना भाजपा सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले, तर कुणाचे तरी सरकार यावे लागेल, त्यासाठी आमच्याकडे कुणाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही विचार करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 'झी २४ तास'ला दिली आहे.

मात्र शिवसेनेबरोबर जाण्याचा पर्याय खुला असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात या राजकीय घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे राज्यातील जनभावना ही भाजपा विरोधात असल्याचे पवारांनी सोनिया गांधींना सांगितले आहे. याचाच अर्थ जनभावना लक्षात घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायला हवं असं शरद पवारांनी सोनिया गांधींना पटवून देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पवारांच्या पुढील खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.