Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार आहे, अशी मोठी घोषणा पवार यांनी आज केली. तसेच संसदीय राजकारणातून पवार निवृत्त होत आहेत. यापुढे निवडणूक लढवणार नाही. राज्यसभेची आता तीन वर्षं राहिलीयत त्यानंतर आता नवी जबाबदारी घेणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. त्यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली.
निवृत्तीची घोषणा करताच सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केल्या. शरद पवार मंचावर असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आणि भावनाविवष झाले. कार्यकर्ते मंचावर गेले आणि पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेण्याची विनंती करु लागले. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पवारांच्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी गावागावातून कार्यकर्ते आले होते. या सगळ्या कार्यकर्त्यांना पवारांनी अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेमुळे धक्का बसला... आणि अनेक कार्यकर्त्यांना रडू कोसळले.
शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा ही खटकणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 'केंद्रात विरोधी पक्ष एकत्र येत असताना पवार यांची घोषणा धक्कादायक आहे, असे ते म्हणाले.
क्रिकेटमध्ये अतिशय उंचीवर गेल्यावर अचानक निवृत्तीची घोषणा केली जाते. त्याचप्रमाण शरद पवार यांनी घोषणा केली असावी,अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे. जर निवृत्त झाले नाही तर लोकच आपल्याला निवृत्त करतात, असेही मुनगंटीवार म्हणाले.
तुम्हीच आमची कमिटी, तुम्हीच आमचा पक्ष.. कमिटी वगैरे आम्हाला काही मान्य नाही.. अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला.. pic.twitter.com/kkWDG2I15s
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठागटे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोजक्याच वाक्यात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट् केले आहे. भाकरी फिरवण्याचे संकेत होते.. पण तवाच फिरवला, असे राऊत म्हणाले.
पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं अजित पवार यांनी समर्थन केले आहे. अध्यक्षपद सोडलं तरी पक्ष पवारांचाच आहे, हा दिवस कधी ना कधी येणार होता, असं अजित पवार म्हणालेत. हा निर्णय पवार कालच जाहीर करणार होते. पण काल मविआची वज्रमूठ सभा असल्यानं काल हा निर्णय घोषित केला नाही, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणणं प्रचंड कठीण जात होते. पवारसाहेब राजकारणात थांबणार असतील, तर आम्ही थांबू नाही तर पक्ष ज्याला चालवायचा त्याला चालवू दे, असं जयंत पाटल यांनी म्हटलं. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बोलताना जयंत पाटील यांना अक्षरशः रडू कोसळले.
पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून स्वतः शरद पवारांना गहिवरुन आलं. त्यांनाही अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही यावेळी स्वतःच्या भावनांना आवर घालता आला नाही. त्यांनीही अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. तर अजित पवार यांनाही त्यांच्या भावना लपवणं अवघड झालं.
दरम्यान, पवार यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल संध्याकाळी पाच वाजता सिल्व्हर ओकवर चर्चा होणार आहे. पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा होणार आहे. तुमच्या मनासारखं करू, असं आश्वासन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलंय. जोपर्यंत पवार निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत यशवंतराव चव्हाण सभागृहातून हटणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. अखेर अजित पवार यांच्या या आश्वासनानंतर पवार सिल्व्हर ओकवर रवाना झाले.