लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक! शरद पवारांच्या देवदर्शनावरुन विरोधकांचं टीकास्त्र

Maharashtra Politics :  शरद पवारांनी आज मुंबईत लालबागचा राजा तसंच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं.. मात्र पवारांच्या या देवदर्शनावरुन विरोधकांनी आरोप केले आहेत.. 

वनिता कांबळे | Updated: Sep 9, 2024, 09:27 PM IST
लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक! शरद पवारांच्या देवदर्शनावरुन विरोधकांचं टीकास्त्र title=

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आज मुंबईत बाप्पांचं दर्शन घेतलं. सकाळी पावणेदहाच्या सुमारास शरद पवारांनी आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.. लालबागच्या राजाच्या चरणी त्यांनी पूजाही केली. शरद पवारांसोबत त्यांची नात रेवती सुळे आणि मुलगी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळेही होते.  लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर शरद पवार निघाले ते चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला.  चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पवारांचा  शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  शरद पवारांच्या देवदर्शनावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

लोकसभा निवडणुकीआधी पायात भिंगरी लावल्यासारखे शरद पवार राज्यभर दौरे करत होते.. तेव्हा माळशिरस आणि पंढपुरात सभा घेण्याआधी शरद पवारांनी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं... विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती सुरु असल्यामुळे विठ्ठलाचं पायावरचं दर्शन तेव्हा बंद होतं. त्यामुळे शरद पवारांनी तेव्हा विठ्ठलाचं मुखदर्शन घेतलं होतं...

शरद पवारांचं याआधीचं देवदर्शन

जुलै 2024 मध्ये सांगलीच्या कवठेमहांकाळच्या आरेवाडीत बिरोबाचं दर्शन घेतलं होतं. सप्टेंबर 2023 आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतले.  मार्च 2023 देहूमध्ये तुकाराम महाराजांचं दर्शन घेतले. 
शरद पवार यांच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्यावरुन नेहमीच चर्चा होत असते... मात्र आता त्यांच्या देवदर्शनावरुन राजकारणही जोरात रंगल आहे.  सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्या म्हणून शरद पवारांनी बाप्पाकडे इच्छा व्यक्त  केली असावी असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी लगावला आहे.

केंद्रिय मंत्री अमित शाह यांचे मुंबईत देवदर्शन 

केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या गणपतींचं दर्शन घेतलं. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर अमित शाह दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी अमित शाहांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.त्यानंतर अमित शाह फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले. आणि तिथे मनोभावे पूजा करत फडणवीसांच्या घरच्या गणपतीचं त्यांनी दर्शन केलं. अमित शाहांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. त्यानंतर अमित शाहांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलं. लालबाग राजाच्या चरणी अमित शाह सपत्नीक लीन झाले. अमित शाहांसोबत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते