'मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल अशी..', पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'मोदींनी..'

Sharad Pawar Fear About Maharashtra: नवी मुंबईमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमामधील भाषणामध्ये शरद पवारांनी मणिपूरचा उल्लेख करत हे विधान केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 29, 2024, 10:29 AM IST
'मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल अशी..', पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'मोदींनी..' title=
जाहीर भाषणामध्ये शरद पवारांचं विधान (फाइल फोटो)

Sharad Pawar Fear About Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईमधील जाहीर सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरविषयक धोरणावर भाष्य करताना शरद पवारांनी हे विधान केलं आहे. शरद पवार यांनी मोदींना मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही, असं म्हणत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.

पवार नेमकं काय म्हणाले?

"मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटते," असं शरद पवारांनी म्हटलं आहे. "मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय," असं शरद पवारांनी म्हटलं. "मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही," अशी टीका पवारांनी केलीय.

काँग्रेस म्हणजे युक्रेनला जाण्याआधी मणिपूरला जाऊन या

दरम्यान, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने मणिपूरची आठवण करुन देत निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधला.

"मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीमध्ये हजेरी लावली होती. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. मणिपूरच्या लोकांचा साधा प्रश्न इतका आहे की, एन. बिरेन यांनी पंतप्रधान मोदींची एकट्यात भेट घेऊन मणिपूरमधील परिस्थितीबद्दल चर्चा केली का? 3 मे 2023 पासून मणिपूर धगधगत आहे. बिरेन यांनी नरेंद्र मोदींना मणिपूरला भेट देण्याचं आमंत्रण दिलं का? युक्रेनला जाण्यापूर्वी मणिपूरला या असं त्यांनी सांगितलं का?" असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> 'कोर्टाने तडीपार केलेली व्यक्ती...', शरद पवारांचा अमित शाहांना टोला; म्हणाले, 'या लोकांच्या...'

'बोट धरुन राजकारणात'वरुन टोमणा

दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजी नगरमधील कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी बोट धरुन राजकारणात आल्याच्या विधानावरुन मोदींवर निशाणा साधला होता.  शरद पवार हे आपले गुरु असून त्यांचं बोट धरुन आपण राजकारणात आल्याचं विधान काही वर्षांपूर्वी मोदींनी केलं होतं. याच विधानाचा संदर्भ देत पवारांनी टोला लगावला की ते वाक्य एकून सभागृहात एकच हशा पिकला. "राजेश टोपे म्हणाले माझं बोट धरून राजकारणात आलो. असं मोदी देखील म्हणाले होते. मात्र मला माझ्या बोटावर विश्वास आहे की ते कुणाच्या हातात दिलं नाही," असं शरद पवार म्हणाले होते.

नक्की वाचा >> 'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'

लोकांनी धडा शिकवल्याचा टोला

छत्रपती संभाजी नगरमधील याच कार्यक्रमात सध्य परिस्थितीवर भाष्य करताना, "आज देशाची परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीची परिस्थिती कशी होती. देशाचे पंतप्रधान त्यांचे सहकारी काय बोलत होते. ते असं बोलतात की देशाची रक्षा त्यातून होत नाही. त्यांनी बंगळूरमध्ये सांगितलं, आम्हाला 400 पार करायचं आहे. त्यांना संविधान बदलायच आहे. देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देते ते बदलणं लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे," असं शरद पवार म्हणाले होते.