सांगली : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी ही जी शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी आहे ती फसवी असून, राज्यातील सरकार बदललं आहे असं वाटत नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये रघुनाथ दादा पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि आत्ता महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली मात्र या दोघांनी ही शेतकऱ्यांना फसवल्याचे पाटील म्हणाले. टप्याटप्याने कर्जमाफी करू नका जो निर्णय घ्यायचा तो एकदाच करा अशी सुचना देखील त्यांनी केली आहे. जर तुम्हाला डोबरमॅन कुत्र्याची शेपटी कापायची आहे तर एकदम कापा. इंचा इंचाने शेपटी का कापता ? अशी उपरोधिक टीका ही पाटील यांनी यावेळी केली.
महाआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी करणार आहे. पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच मार्च 2020 च्या आधी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी ही एप्रिल 2020 पर्यंत होणार आहे. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सरकारने एक समिती नियुक्ती केली आहे. ही टीम नियमित आढावा घेणार आहे. बँकांकडून सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती मागवली आहे.