Shinde Group Ad Controversy: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-भाजपा सरकारसंदर्भातील सर्वेक्षणानंतर मंगळवारी छापण्यात आलेल्या सरकारी जाहिरातीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीमध्ये राज्यात एकनाथ शिंदे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असा संदेश देण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या माध्यमातून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच या जाहिरातीलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नसल्याच्या मुद्द्यावरुनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं. या जाहिरातीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळत असल्याचा संदेश जात असल्याच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या जाहिरातीवरुन कुरघोडीचं राजकारण सुरु असतानाच भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट बेडकाची उपमा दिली आहे. जाहिरात प्रकरणावर बोलताना बोंडेंनी शिंदेसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या विधानावरुन शिंदे गट आणि भाजपामधील तणाव वाढत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
अनिल बोंडे यांनी या जाहिरातीसंदर्भात बोलताना, बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होता येत नाही. शिंदेंना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटू लागला आहे, अशी विधानं केली आहेत. "बेडूक कितीही फुगला तरी हत्ती थोडी बननणार आहे. एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टी, जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. उद्धवजी ठाकरेंना वाटत होतं की मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथजी शिंदेंना वाटायला लागलं आहे की ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे," असं बोंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना अनिल बोंडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना फडणवीस हे राज्यातील सर्वच घटकांसाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे. "खरं पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस हा महाराष्ट्रातील असा चेहरा आहे की जो बहुजनांसाठी काम करतो. मग ते ओबीसी असो, मराठा असो, धनगर समाज असो किंवा आदिवासी कल्याणचं असो, अनुसुचित जमातीचं काम असो, दिव्यांगांचं काम असो सर्व गोष्टींना न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आहे. मी स्वत: हे पाहिलं आहे. काल मी मराठवाड्यात होतो. प्रत्येक ठिकाणी देवेंद्रजींचं नाव अगदी खेड्यापाड्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये, कामगारांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये घेतलं जातं," असं अनिल बोंडे म्हणाले.
अनिल बोंडेंनी नोंदवलेल्या या प्रतिक्रियेवर शिंदे गटाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान आज म्हणजेच बुधवारी (14 जून 2023 रोजी) छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शिंदेंबरोबरच देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो झळकत असून जाहिरातीच्या वरील भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो दिसत आहे. या जाहिरातीच्या तळाशी शिंदे गटातील मंत्र्यांचेही फोटो छापण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही पंतप्रधान मोदी आणि शिंदेंच्या फोटोसहीत मंगळवारी (13 जून 2023 रोजी) छापलेल्या जाहिरातीला खोडसाळपणा असं म्हटलं आहे.