शिवसेना-भाजपचा निवडणुकीचा स्वबळाचा नारा, पण मनातून...

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच अवस्था भाजप - शिवसेनेच्याबाबतीत आगामी काळातही अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 7, 2018, 10:16 PM IST
शिवसेना-भाजपचा निवडणुकीचा स्वबळाचा नारा, पण मनातून...

पुणे : तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच अवस्था भाजप - शिवसेनेच्याबाबतीत आगामी काळातही अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या बढाया दोन्ही पक्षांचे नेते मारत असले तरी दोघांनाही प्रत्यक्षात वेगळं होण्याची मनातून इच्छा नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पुणे जिल्ह्यातील भिवडीमध्ये आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात शिवसेनेचे विजय शिवतारे आणि भाजपचे राम शिंदे या दोन मंत्र्यांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीतून तेच स्पष्ट होतय. 

आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांची २२७ वी जयंती आज होती. त्यानिमित्तानं उमाजी नाईक जयंती सोहळ्याचं आयोजन त्यांचं जन्मगाव असलेल्या भिवडी इथं करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच या कार्यक्रमाला उपस्थित राहीले. खरतर हे ५० वर्षांत पहिल्यांदाच घडलं. आणि ते स्वत मुख्यमंत्र्यंनी बोलूनही दाखवलं. रामोशी समाजाच्या राजकीय ताकदीची जाणीव झाल्यामुळे असेल कदाचित. मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या विकासासाठी आश्वासानांचा पाढाच यावेळी वाचला. आरक्षण हा त्यापैकीच एक.

रामोशी समाजाच्या भल्यात आपलंही भलं सामावलं असल्याची जाणिव राजकीय पक्षांना आहे. त्याचवेळी सत्तेचा आकडा गाठण्यासाठी दोन पक्षांनी एकत्र राहण्याची गरजही ते व्यक्त करतात. पुढील २५ वर्षे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालील सरकार राहावं अशी इच्छा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी योवेळी व्यक्त केली.  मात्र काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नेतृत्व शब्दाबाबत सारवासारव केली. युती टिकावी यावर मात्र ते ठाम राहिले. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी तोच धागा पकडला. रामोशी सामाज पाठीशी असल्यानं तुमची गरज पडणार नाही पण मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आहे म्हणून एकत्र येऊ ‘असा टोला त्यानी शिवतारेंना लगावला.