मुंबई : Shiv Sena leader Arjun Khotkar : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होणार आहेत, हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्लीत खोतकर यांनी शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. आज त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आमदार अब्दुर सत्तार यांच्या उपस्थित भेट घेतली. यावेळी पुढील वाटचालीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्जुन खोतकर हे आपण शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र, खोतकर यांनी EDची नोटीस आल्यानंतर त्यांनी आपला इरादा बदल्याची चर्चा आहे. कारवाई वाचविण्यासाठी खोतकर हे आता शिंदे गटात जात असल्याचे बोलले जात आहे. त्याआधी भाजपचे नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यसोबत ब्रेकफास्ट घेतला. दानवे आणि खोतकर हे हाडवैरी समजले जातात. पण त्यांच्यात आता समेट घडवून आणण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा आता नेम नाही. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे आता एकत्र आले आहेत. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची जवळपास एक तास बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाल्यानंतर ही बैठक पार पडली.
दरम्यान, राज्यत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अनेकांचा मंत्रिमंडळ विस्तार पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार दिल्लीत ठाण मांडून आहेत. ते भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. 3 ऑगस्टआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा दावा सत्तारांनी केला आहे.
तर येत्या 31 जुलैला अर्जुन खोतकर सिल्लोडमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेसोबत आहे असे सांगणारे अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होत आहेत.