मुंबई : Shivsena Political News : शिवसेनेमध्ये कोकणात वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना पदावरुन हटविण्यात आले आहे. त्याठिकाणी नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामुळे रामदास कदम प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी कालच खेड येथून मुंबईकडे प्रस्तान केले. आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच ते मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्यादृष्टीने शिवसेनेकडून भाकरी परतविण्यात आली आहे. यावेळी रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून त्याजागी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, हे करण्यामागे मंत्री अनिल परब प्रकरण त्यांना भोवल्याचे सांगितले जात आहे. दापोलीत अनिल परब यांना बांधकाम केले होते. ते अनधिकृत असून याबाबत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना रसद पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. याप्रकरणानंतर शिवसेनेचे नेतृत्व नाराज होते. त्यानंतर दापोलीत खांदेपालट करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे रामदास कदम यांचे काही समर्थक बंडखोरांना बळ देत असल्याची बाबपुढे आली होती. ही बाब 'मातोश्री'वर पोहोचली होती. रामदास कदम यांच्या गटातील काही पदाधिकाऱ्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्याचवेळी पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी दौऱ्यावर रामदास कदम यांना टोला लगावला होता. दापोलीला पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन आलो होतो. ज्यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली, अशी सूचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली होती.
त्यानंतर दापोली नगरपंचायत प्रचारसभेच्या बॅनरवरुन शिवसेना आमदार योगेश कदम यांचा फोटो गायब झाला आहे. त्यांच्या जागी सूर्यकांत दळवी यांचा फोटो दिसत आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) युती केली आहे. मात्र, याठिकाणी रामदास कदम यांचे काही समर्थक बंडखोरांना बळ देत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
दरम्यान, रामदास कदम यांचा पत्ता कट करुन शिवसेनेकडून सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावेळी रामदास कदम यांच्या समर्थकांना बाजूला करण्यात आले. त्याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली होती. पक्षनेतृत्त्वाने यावर मौन बाळगत त्यांच्यापासून अंतर राखले होते. त्यानंतर आता पक्षाने थेट बालेकिल्ल्यातच पंख छाटले गेले. आता रामदास कदम काय पाऊल उचणार याचीच उत्सुकता आहे.