औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्यांची डोकी फोडू. तंगड्या तोडू, अशी धमकी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. सरकार स्थापनेचा तिढा अद्याप सुरूच असल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आमदार फोडाफोडीचा प्रयत्न होण्याची भीती शिवसेनेला वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्तार यांनी हा सज्जड दम भरला आहे. जे शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतील त्यांची डोकी फोडू, पाय तोडू, जेणेकरून त्या व्यक्तीला चालता येणार नाही की आपलं तोंड दाखवता येणार नाही, असेही सत्तार म्हणाले.
शिवसेनेने शुक्रवारी २२ नोव्हेंबरला 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे स्वत: आमदारांशी चर्चा करणार आहेत. ही बैठक अंतिम असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तसेच ही बैठक केवळ एक दिवसाची नसून चार ते पाच दिवसाची असल्याचंही सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे पुढची रणनीती ही त्या बैठकीनंतरच ठरेल असंही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होत आहे. या बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला, मंत्रीमंडळातील खातेवाटप, महामंडळाचे वाटप,किमान समान कार्यक्रम, विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांचं वाटप कसं असावं याबाबत तयारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत शिसेनेशी चर्चा केली जाईल. शिवसेनेबरोबर अंतिम चर्चा करण्याआधी दोन्ही पक्षात एकवाक्यता नर्माण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं समजतंय. मात्र या बैठकीला शरद पवार हजर राहणार नाहीत. राज्यातील इतर नेते किमान समान कार्यक्रमावर चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे.