पुढची २५ वर्षं सरकार टिकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

 पाऊस आला ही चांगली गोष्ट आहे..पण आता पाऊस नको रे बाबा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  

Updated: Dec 15, 2019, 06:08 PM IST
पुढची २५ वर्षं सरकार टिकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास  title=

नागपूर : हे सरकार पाच वर्षंच काय, पुढची २५ वर्षं टिकेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागपुरात दिलीय.  नागपूर अधिवेशनासाठी मुख्यमंत्री नागपुरात दाखल झालेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या नागपुरातल्या आगमनानंतर नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस आला ही चांगली गोष्ट आहे..पण आता पाऊस नको रे बाबा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  

उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे.

शेतकरी कर्जमाफी, स्थगित केलेले प्रकल्प, खातेपाटप यांसारख्या मुदद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या अंमलबजावणीवरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातली दरी वाढवण्याचा भाजपचा अधिवेशनात प्रयत्न असेल.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दलही भाजपने आक्रमक भूमिका घेण्याचं सुतोवाच केलं आहे.

निवडणुकीपूर्वीची वक्तव्ये किंवा आश्वासनांची सत्ताधाऱ्यांना आठवण करून दिली जाईल असं भाजपने म्हटलं आहे.