Loksabha Election 2024: लोकसभा 2024 निवडणुकीचे आत्तापासून वारे वाहायला लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकासाठी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.सुनील तटकरे यांची लोकसभेसाठी कोंडी झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
रायगड लोकसभा जागेवरुन महायुतीत ठिणगी पडल्याचे चित्र आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष रायगड जागेसाठी आग्रही असताना आता भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही रायगड लोकसभेवर दावा सांगितला आहे. शिवसेनेचे तीन आमदार असल्याने रायगडची जागा मिळावी अशी मागणी सेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे महायुती मधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
भाजपपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानेही रायगडच्या जागेवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे जिल्हयात महायुतीमधील बेबनाव समोर आलाय. आज रायगडमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परीषद घेत रायगडची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी केली आहे. केवळ एकच आमदार असलेले पक्ष या जागेवर दावे सांगताहेत आमचे तर तीन आमदार आहेत मग आम्ही का दावा सांगू नये असा टोला, राजीव साबळे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून या जागेची मागणी करणार आहोत, असे जिल्हयातील स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम होत चालले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेचे संभाव्य उमेदवार अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सुनील तटकरे म्हणजे विश्वासघातकी माणूस बॅरिस्टर अंतुले पासून शेकापसह ज्यांनी त्यांच्या घरात सर्वच राजकीय ऐश्वर्य दिले त्या शरद पवार यांचा देखील त्यांनी विश्वासघात केला. अशा विश्वासघात माणसाला रायगडची जनता या निवडणूकीत धडा शिकवेल, अशा शब्दांत गीते यांनी तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.