'मोदी ब्रँड होता, पण आता देशी..,' संजय राऊतांचं विधान ऐकून उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर; सभागृहात पिकला हशा

Shivsena Foundation Day: मोदी ब्रँड होता पण आता ती ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 19, 2024, 08:46 PM IST
'मोदी ब्रँड होता, पण आता देशी..,' संजय राऊतांचं विधान ऐकून उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर; सभागृहात पिकला हशा title=

Shivsena Foundation Day: मोदी ब्रँड होता पण आता ती ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या 58 वा वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

"उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणातील हिरो आहेत. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 19 जून 1966 रोजी जे महत्व होते तेच आजही आहे. शिवसेनेने फक्त पुनर्जन्म घेतला नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतली आहे. लोकसभेतील विजयाचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं आहे. जिंकले त्यांच्याप्रमाणे लढले, संघर्ष केला अशा योद्ध्यांचाही सत्कार केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तो तुमच्यासारख्या फडतूस लोकांसमोर झुकणारा नाही हे मोदी आणि शाहांना ज्यांनी ठणकावून आणि कृतीतून सिद्ध करुन दाखवलं त्या उद्धव ठाकरेंकडे देश आशेने पाहतोय," असं संजय राऊत म्हणाले.

"नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव अशक्य आहे. मोदी 400 पार घेऊन येणारच, तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेवून आले होते," असा टोला संजय राऊतांनी लगावला. त्या भाजपचा आणि मोदींचा खुळखुळा कोणी केला असेल तर उद्धव ठाकरेंना केला आहे. शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना संपणार नाही. आमच्यावर कितीही अघोरी प्रयोग केले तरी काही होणार नाही. तुम्ही कितीही रेडे कापा असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

"त्या डोममध्ये डोमकावळे जमले आहेत. डोमकावळ्यांचं संमेलन सुरु आहे. आमचा 58 वा वाढदिवस आहे ते अडीच आहेत," असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. गुजरातचे सोमेगोमे हौशे नवशे आले आणि वार करून सेना संपवता येईल हे स्वप्न कुणी पाहू नये असा इशाराही त्यांनी दिली. 

"छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तख्तापुढे झुकवली नाही. तोच वारसा उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत. भाजपा आता आभार यात्रा काढणार आहे. पराभव झाल्याबद्दल, नरेंद्र मोदींचं बहुमत कमी केल्याबद्दल काढणार आहेत का? यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी हा ब्रँड होता आता बहुतेक ती ब्रँडी झाली आहे. नशेत आहेत. आता ते ब्रँडीचे दोन दोन घोट मारत आहेत. हा काय ब्रँड राहिला नाही, आता देशी ब्रँडी झाली आहे. या ब्रँडीच्या नशेत असली थेरं सुचत आहेत. अरे तुम्हाला महाराष्ट्राला झिडकारलं, लाथाडलं आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली.

"राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना आहे की मोदींची हे मला समजत नाही. मला टीव्हीवर रामच दिसत नव्हता. आता रामाला मोदी दिसले असावेत आणि लाथ घातली असावी," असंही राऊत म्हणाले. देशाच्या जनतेने, महाराष्ट्राने, उत्तर प्रदेशने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते ढोंगी, नकली होतं," अशी टीका त्यांनी केली. 

"हा त्यांचा शेवटचा आकडा आहे. यानंतर महाराष्ट्रात आकडा लागणार नाही. हा शेअर बाजार तात्पुरता असतो. दिल्लीत आणि महाराष्ट्रात तो कोसळणार आहे. महाराष्ट्रात तुमच्यe बेईमानीचा स्ट्राइक रेट वाढला आहे. भाजपाने 110 जागा 500 ते 1000 च्या फरकाने जिंकल्या आहेत. तो विजय मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तिकर यांचा विजय चोरला तसं हा विजय चोरला. भाजपा 120 वर अडकला आहे," असं राऊत म्हणाले.