"ज्याप्रमाणे भटके कुत्रे पकडण्याची गाडी फिरते, त्याप्रमाणे भाजपा....", उद्धव ठाकरेंची सडकून टीका

Uddhav Thackeray in Mahad: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात (Konkan) असून महाडमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली.   

शिवराज यादव | Updated: May 6, 2023, 08:31 PM IST
"ज्याप्रमाणे भटके कुत्रे पकडण्याची गाडी फिरते, त्याप्रमाणे भाजपा....", उद्धव ठाकरेंची सडकून टीका title=

Uddhav Thackeray in Mahad: बारसू रिफायनरीवरुन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन हे नाचत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी कर्नाटकात मराठी भाषिकांवर अत्याचार सुरु असताना, मुख्यमंत्री प्रचार करत आहेत यावरुनही टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात (Konkan) असून महाडमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य तसंच केंद्र सरकारवर टीका केली. कर्नाटक निवडणुकीत 'जय बजरंगबली' घोषणा देणं हा धार्मिक प्रचार नाही का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी यावेळीकेली. ज्याप्रमाणे भटके कुत्रे पकडायची गाडी फिरते, त्याप्रमाणे भाजपाची गाडी भ्रष्टाचार पकड मोहीम सुरु आहे. दिसला भ्रष्टाचार की टाक भाजपात असं सुरु आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

"अनेकांना शिवसेना संपवली पाहिजे असं वाटत होतं. अनेकांना स्वत: म्हणजे शिवसेना असं वाटत होतं. पण शिवसेना मोठी करणारी लोकं माझ्यासोबत आहेत. काहींना माझ्यावर टीका केल्याशिवाय घशातून घास खाली उतरतच नाही. मला तर वाटतं त्यांना रोज भाकरच मिळत नाही. पण कोणाला माझ्यामुळे भाकरी मिळत असेल तर याचा आनंद आहे," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.  

"स्नेहल जगताप आणि इतरांना मी मातोश्रीवर पक्षप्रवेश करुयात असं म्हणत होतो. पण ऐकतील ते जगताप कुटुंबीय कसले, त्यांनी महाडमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. स्नेहलताई आणि इतरजण काँग्रेसमधून आले असून त्यानंतर काही जणांच्या पोटात गोळा आला आहे. सत्ता असते त्या सत्तेकतडे सगळेजण जातात, पण आज माझ्याकडे सत्ता नाही. पाठीवर वार करत आपल्या लोकांनीच गद्दारी केली. मला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं. भाजपाने आपलं चिन्हही चोरलं, नावही चोरलं आणि त्यांना दिलं. माझ्या हातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या नावाशिवाय काही नाही. पण तरीही तुम्ही सोबत आला आहात. याआधी असं आश्चर्य घडलेलं नाही," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

"आपण महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहोत. त्यामुळे काँग्रेस मी फोडत नाही आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जिंकवण्यासाठी शिवसैनिकांनी मदत केली. एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकमूशाही वृत्ती आहे तिचा पराभव करु शकणार नाही," असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. 

दरम्यान यावेळी फटाके वाजत असल्याने उद्धव ठाकरेंनी आपलं भाषण थांबवलं. यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे फटाके शिवसैनिकासारखे आहेत, पेटल्यावर ऐकत नाही. उद्या हे फटाके त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाही अशी अप्रत्यक्ष टीका शिंदे गट आणि भाजपावर केली. 

"आज सकाळी बारसूला जाऊन आलो आहे. महाड मतदारसंघ आपला आहे, भगव्याचा आहे. तो केवळ निवडणुकीपुरता नाही.  महाडामध्ये भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इथे पवित्र माती आहे, ज्यात तुम्हाला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. निष्ठा कशाला म्हणतात हे तानाजी मालुसरे यांनी शिकवलं आहे. तानाजी मालुसरे काय महाराजांकडे निवडणुकीचं तिकीट मागायला गेले नव्हते. मेले तरी बेहत्तर, पण भगवा फडकवणार हा त्यांचा निश्चय होता," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"हो मी बारसूसाठी पत्र लिहिलं होतं. मला खोटं बोलण्याची गरज नाही कारण मी पाप केलेलं नाही. उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन हे नाचत आहेत. यांनी जागा विकली आहे, मलिदा खाल्ला आहे. यादीत सगळे उपरे आहेत. नागोबा आता तिथे मालक म्हणून बसले आहेत. त्यांना तिथे प्रकल्प होणार हे माहिती होतं. जे गद्दार गेले ते माझ्याकडे वारंवार या प्रकल्पासाठी येत होते. त्यावेळी मी विनाशकारी प्रकल्प आहे तर मग गुजरातला जाऊ दे असं म्हटलं होतं. सगळा घटनाक्रम पाहता आपलं सरकार पाडलं आणि तेथून संमती आली. अंतिम मंजुरी मी स्वत: तिथे जाऊन देणार होतो. त्या कंपनीला प्रेझेंटेशन द्यायला लावणार होतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

आज येथे बंदोबस्ताला पाठवण्यासाठी पोलीस नाहीत. सगळे पोलीस बारसूत पाठवले आहेत. घरात, गच्चीवर सगळीकडे पोलीस आहेत. कदाचित बाथरुममध्येही पोलीस गेले असतील. एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लावला असता तर त्यांना अडवलं असतं. तिथे चीन घुसखोरी करत असताना केंद्र सरकार शब्द काढायला तयार नाही. इथे माझ्या गोरगरिब कुटुंबावर लाठ्या चालवल्या जात आहेत. मी पोलिसांशिवाय जाऊन तिथे उभा राहू शकतो तर मग तुम्ही का नाही?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

"कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र एकीककरण समिती उचापती लोकांची संघटना असून त्यांचा बंदोबस्त करु असं म्हटलं आहे. गेली अनेक दशकं. पिढ्या कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रातील मराठी बांधव टाहो फोडत आहे. भाषिक अत्याचार सुरु आहे. महाराजांचा पुतळा हटवला होता. पण आमचे मुख्यमंत्री कानडी आप्पांचे भांडी घासत आहेत. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? आज त्यांनी कानडी भाषेत जाहिरात दिली आहे. भांडी घासायला जाताना लाज वाटत नाही का? मिंध्यांमध्ये हिंमत असेल तर पत्रकार परिषद घेत भाजपाचा पराभव करा असं सांगितलं पाहिजे," असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. 

"एकावर दोन फ्री असणाऱ्यांची काय सांभाळावं अशी पंचाईत झाली आहे. खाली वाकले तर टोप पडतो आणि टोप उचलायला गेले की पोरं पळत सुटतात. सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. पण त्यांचं पोटच त्यांच्यावर आहे," अशी टीका त्यांनी राणे कुटुंबावर केली.