'सीबीआय चौकशी करा', नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूंनंतर उद्धव ठाकरेंची मोठी मागणी, म्हणाले 'खेकड्यांच्या हाती...'

नांदेडमध्ये 8 दिवसांत 89 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आरोग्य यंत्रणेची दुरावस्था चव्हाट्यावर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर संताप व्यक्त केला असून या सरकारला घऱी बसवलं पाहिजे असं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 6, 2023, 01:19 PM IST
'सीबीआय चौकशी करा', नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूंनंतर उद्धव ठाकरेंची मोठी मागणी, म्हणाले 'खेकड्यांच्या हाती...' title=

नांदेडमध्ये 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर अशा 8 दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 38 बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दरमयान उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून या सरकारला घऱी बसवलं पाहिजे असं म्हटलं आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना एक फूल, दोन हाफ असा सरकारचा उल्लेख करत सडकून टीका केली. 

"मी अस्वस्थ, उद्विग्न आहे. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत ते पाहिल्यानतंर संताप होतो. जगभरात कोरोनाचं संकट असताना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. आजही तोच महाराष्ट्र आहे. तीच आरोग्य यंत्रणा आहे. ज्या आरोग्य यंत्रणेने जग व्यापलेल्या संकटाचा यशस्वीपणे सामना केला त्याची आज सरकार बदलल्यानंतर दुर्दशा झाली आहे. कोरोनाच्या काळात मुंबई, महाराष्ट्रात याच डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्स यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली. महाराष्ट्र हे पहिले किंवा एकमेव राज्य आहे जिथे ड्रोनच्या सहाय्याने औषधं पुरवली होती. काही डॉक्टर. परिचारिका आणि रुग्ण यांचा मृत्यू झाला होता. पण ते मागे न येता योद्ध्यासारखे लढले. आज त्यांना बदनाम केलं जात आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"कळवा, नागपूर येथील बातम्या येत आहेत. पण जबाबदारी कोणी घेत नाही याचा संताप आहे. महाराष्ट्रात संकट आल्यावर मुख्यमंत्री कुठे आहेत? एक फूल दोन हाफ कुठे आहेत? हॉस्पिटलमध्ये बळी जात असताना नक्षलवाद्यांचा सामना कसा करायची याची चर्चा करण्यासाठी दिल्लीत बसले आहेत. ते संकट आहेच पण रुग्णालयात जितके बळी गेले आहेत तितके तर काही वर्षात नक्षलवादी हल्ल्यात गेले नाहीत. तुम्ही कारण शोधलं पाहिजे. या ठिकाणी जाऊन कारण शोधणं हे काम होतं," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

नेमकं नांदेडच्याच डीनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कळव्यातही बळी गेले आहेत. एका मस्तवाल खासदाराने संडास साफ करायला लावला. त्यानंतर त्याच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर धमकावण्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे का? औषधं बाहेरून का आणावी लागत आहेत? इतक्या योजना आहेत तरी बाहेरून औषधे का? करोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता. साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. निविदा प्रक्रियेशिवाय औषधं खरेदी केली जात असतील तर त्यात भ्रष्टाचार होणारच. तुम्ही त्यासाठी दार उघडं करुन देत आहात. जिथे औषधं खरेदी झालेली नाही किंवा पोहोचलेली नाहीत तिथे कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

"युतीचं सरकार असताना खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. अशा खेकड्यांच्या हाती कारभार गेला आहे का? मृतांच्या नातेवाईकांना मदत देऊन भागणार आहे का? हे सरकार यमाचे दरबार आहे. जाहिराती करायला यांच्याकडे पैसे आहेत. गुवाहाटीला जायला, गोव्यात जावून नाचायला यांच्याकडे पैसे आहेत. पण औषधासाठी पैसे नाहीत. या सरकारची निःपक्ष चौकशी झाली पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अजित पवार आमच्यासोबत असताना सरकारवर ताशेरे ओढले होते. हाफकिनकडून औषधं मागवतो म्हणणाऱ्या दिव्य ज्ञानी मंत्र्यांची बुद्धीवर इलाज करून मग त्यांना खाते द्या. सलग सुट्ट्या असतात तेव्हा डॅाक्टर कमी असतात. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. डॅाक्टरांची ड्युटीज व्यवस्थित लावायला हव्या होत्या का? - मनुष्यबळ आमच्यावेळीही कमी होते. तरीही आम्ही सामना केला होता. आताच्या पोस्टिंगचे रेटकार्ड तयार केले आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.