आम्ही काय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? उद्धव ठाकरे न भेटल्याने महिला कार्यकर्त्या संतापल्या, खैरेंनी दिली तंबी

LokSabha: उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने महिला आघाडी नाराज झाली आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये ताटकळत ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली.   

शिवराज यादव | Updated: Mar 20, 2024, 02:21 PM IST
आम्ही काय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? उद्धव ठाकरे न भेटल्याने महिला कार्यकर्त्या संतापल्या, खैरेंनी दिली तंबी title=

LokSabha: उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या नाराज झाल्या आहेत. आपल्याला हॉटेलमध्ये ताटकळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केली आहे. आपली नाराजी त्यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोरही बोलून दाखवली. आम्ही काय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? असा उद्विग्न सवाल महिलांनी विचारला आहे. दरम्यान महिलांनी प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया दिल्याने चंद्रकांत खैरे यांनी नाराजी जाहीर करत त्यांना सुनावलं. 

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुका तसंच पक्षाची मोट बांधण्याच्या निमित्ताने ते दौरे करत असून सभाही घेत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे संभाजीगरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या. पण भेट न झाल्याने त्या नाराज झाल्या. 

"उद्धव ठाकरे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही भेटण्यासाठी पोहोचलो होतो. पण 2 तास झाले तरी ते भेटले नाहीत. इतक्या वर्षांपासून पक्षाचं काम करत असतानाही साहेब आलेलं आम्हाला कळत नाही याचं दु:ख आहे. त्यांनी थोडा वेळ आमची भेट घेऊन तुमचं काय सुरु आहे अशी विचारणा केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. याच्याने आम्हाला समाधान मिळेल. आमची नाराजी नाही, पण वाईट वाटत आहे," अशी खंत महिलांनी व्यक्त केली. 

आम्ही उद्धव ठाकरेंच्या अंगरक्षकांकडे संदेश दिला होता. महिला पदाधिकारी आले असून भेटायचं आहे असा निरोप देण्यास सांगितलं होतं. आम्ही उद्धव ठाकरेंना नाही तर कोणाला भेटायचं? दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

दरम्यान महिलांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्याने चंद्रकांत खैरे त्यांच्यावर चिडले. त्यांनी हात जोडून तुम्ही येथून निघून जा अशी विनंती त्यांना केली. पण महिलांनी मात्र आपण भेटल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा घेतला.