प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : उसने पैसे वेळेवर परत करत नसल्याच्या करणातून कोल्हापूर जिल्ह्यातील आलास इथं एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दगडू आप्पासाहेब तगडे (वय 50 ) असं यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तगडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कर्नाटकमधील राजू गुरव याच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडू तगडे हे शिरोळ तालुक्यातील रहिवासी आहेत. तर आरोपी राजू गुरव हा कर्नाटक मधील रहिवासी आहे. या दोघांची ओळख एका मध्यस्थामार्फत झाली होती. या ओळखीतून दगडू तगडे यांनी राजू गुरव यांच्याकडून 80 हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत मिळावेत अशी मागणी राजू गुरव हे दगडू तगडे यांच्याकडे करत होते.
तरी देखील तगडे हे पैसे द्यायला टाळाटाळ करत होते. हाच राग मनात धरून संशयित आरोपी राजू गुरव हा मिरजे रोपवाटिका जवळ रात्री 10 च्या सुमारास आला. तिथे त्याने दगडू तगडे यांना देखील बोलावून घेतलं. यावेळी गुरव यांनी तगडे यांच्याकडे उसने घेतलेले 80 हजार तात्काळ दे असा तगादा लावला. यातून दोघांमध्ये वाद झाला.
त्यावेळी संशयित आरोपी राजू गुरव याने रागाच्या भरात दगडू आप्पासाहेब तगडे याच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामध्ये तगडे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.