सावंतवाडी : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणे कशी वेगाने बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. शिवसेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. नारायण राणे आणि केसरकर वाद सर्वश्रूत आहे. युती झाल्यानंतर नारायण राणेंनी चिपी विमानतळ इमारतीच्या उद्घाटनाला येणे आणि केसरकरांनी त्यांचे स्वागत करणे ही नवीन समीकरणाची सुरुवात आहे का अशी चर्चा सुरू झाली. यावेळी नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमान उड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे यांनी या टर्मिनल उद्घाटनावरून कोपरखळ्या मारत उद्घाटन झाले खरे पण विमान कधी उतरणार, असा सवाल करत आधी विमान उतरवा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. मात्र राणेंच्या याच टीकेला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्यांच्याच शब्दात उत्तर दिले. गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेताच आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर काम करतो, असा टोला लगावला आहे. या दोघांच्या टीकेवरून मुख्यमंत्री यांनी देखील मिश्कील भाषण करत नारायण राणे यांनी स्वप्न पालकमंत्री दीपक केसरकर पूर्ण करत असल्याचे वक्तव्य केले