सांगली : बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते असा पूर्वापारचा समज. काळाच्या ओघात बदल होऊन दोघंही एकमेकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे ठाकतात हे आपण पाहिलंय.
मात्र चिमुरड्या भावाच्या रक्षणासाठी एक चिमुकली बहीण धावून आलीय. सांगलीतील वसवडे गावात चार वर्षीय बहिणीने दीड वर्षाच्या भावाचा जीव वाचवलाय.
वसवडे गावात सुनील शिरोटे हे आपल्या आई-वडिल पत्नी आणि मुलगा-मुलीसह राहतात. रविवारी शिरोटे कुटुंबातील सगळी मंडळी कामात व्यस्त होती. त्यावेळी सुनील यांची चार वर्षीय मुलगी स्नेहल आणि दीड वर्षीय मुलगा सुजल हे अंगणात खेळत होते.
खेळता खेळता सुजल शौचालयासमोर असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. पाचशे लीटरच्या या टाकीत जवळपास चारशे लीटर पाणी होते. कट्ट्यावर उभं राहून सुजल पाण्याच्या टाकीत पाहू लागला. त्यावेळी तोल जाऊन सुजल या टाकीत पडला. टाकीत पडल्यानंतर सुजल पाण्यात तोंड बुडून गटांगळ्या खाऊ लागला.
सुजल बुडत असल्याचे त्याच्या बहिणीने पाहिलं. प्रसंगावधान दाखवत तिने तोंडाच्या बाजूने बुडत असलेल्या सुजलचे पाय धरले. पाण्यात सुजलचा श्वास गुदमरत होता. भावावरील संकट पाहून स्नेहल जीवाच्या आकांतानं ओरडली. तिचा आवाज ऐकून घरातील सगळी मंडळी बाहेर आली आणि त्यांनी सुजलला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलं.