अमर काणे, झी मीडीया नागपूर : तस्करीसाठी तस्कर कोणती शक्कल वापरतील याचा काही नेम नाही. अशातच हातोडीमधून सोन्याची तस्करी दुबईहुन नागपूर विमानतळामार्गे करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मजूराचं नाव राहुल यादव असं आहे. त्याच्यासोबत बॅग घ्यायला आलेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दुबईतील मोती खान या व्यक्तीने मजूर राहुल यादवला बॅग भारतामध्ये पोहोचवण्यासाठी आमिष दिलं होतं. मोती खानने राहुल यादवची दुबईहून नागपूरपर्यंतचं तिकीट काढलं होतं. त्यानंतर नागपूरहून राजस्थानपर्यंत जाण्याचीही सोय त्याने केली होती. नागपूर इथं ती बॅग ज्यांना सोपवायची आहे त्यांचे फोटो देण्यात आले होते.
राहुल यादव दुबई वरून भारतात आला त्याने सोबत आणलेली अवजारांची बॅग विमानतळावर पार्किंगमध्ये अक्रम मलिक आणि इर्शाद खान नावाच्या राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील दोघांना दिली. दुबईवरून नागपूर विमानतळ मार्गे सोने तस्करी होत असल्याचा संशय नागपूर पोलिसांना होता. त्याकरता त्यांची संशयितांवर पाळत होती, पोलिसांनी बॅगची तपासणी केली.
बॅगमध्ये सापडलेल्या अवजारांची सोनाराकडून तपासणी केली असता त्यामध्ये छुप्या छिद्रातून हातोडीमध्ये 337 ग्रॅम सोनं तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आलं. यामुळे नागपूर विमानतळ हे परदेशातून होणाऱ्या सोने तस्करीचा नवा मार्ग बनला नाही ना?, अशी शंका व्यक्त होतं आहे.