ज्येष्ठ नागरिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केबिन सोडली

प्रशासकीय वर्तुळात चर्चा

Updated: Jan 4, 2020, 01:37 PM IST
 ज्येष्ठ नागरिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केबिन सोडली title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर :  जिल्हाधिकारी कार्यालयात आपली कैफियत मांडण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला भेटण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी केबिन सोडून आले. याची चर्चा आता संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एवढंच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागणुकीचा आदर्श साऱ्यांनीच घ्यावा अशी देखील चर्चा आहे. 

 सोलापूर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी  काल विविध बैठकाच्यानंतर भेटीसाठी आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी वेळ दिला. याच वेळी ऍड शर्मिला देशमुख या आपली कैफियत मांडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्या. रत्नागिरी ते नागपूर महामार्गात त्यांची जमिन गेली आहे.  त्यांना ६ कोटी ६५ लाख रूपये इतका मोबदला मंजूर झाला  आहे. पण याबाबत तक्रार आल्याने पंढरपूर प्रांत कार्यालयात यावर सुनावणी सुरू आहे. पण हेलपाटे मारूनही याबाबत निकाल लागत नव्हता.

 

शर्मिला यांचे वडील चंद्रकांत देशमुख हे पाय घसरून पडल्याने  त्यांच्यावर सोलापूर मधील रूग्णालयात उपचार होते. काल शुक्रवारी त्यांना रूग्णालयातून सोडल्यानंतर ते जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी तसा निरोप जिल्हाधिकारी यांना दिला. पण जिल्हाधिकारी डाॅ.  भोसले यांनी वयोवृद्ध देशमुख यांना वरच्या मजल्यावर जाण शक्य नाही हे समजताच ते स्वतः आपली केबीन सोडून गाडीत बसलेल्या चंद्रकांत देशमुख यांना भेटण्यासाठी गेले.

जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी देशमुख यांची कैफियत ऐकून पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून देशमुख यांच्या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील सूचना दिल्या. यामुळे देशमुख कुटुंबिय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वागणुकीमुळे भारावून गेले. जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांच्या या भेटीची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.