सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यामधला एक निष्ठावंत शिवसैनिक अनवाणी फिरतोय. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायाच चपला घालीन, असा निर्धार त्यानं केला आहे. शंकर मेटकरी असं या शिवसैनिकांचं नाव आहे. शंकर सोलापुरातल्या महूद गावचा रहिवासी आहे. घरची परिस्थिती बेताची असलेला शंकर मेटकरी गेल्या वीस - पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत काम करतोय. सध्या मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेनेतले संबंध ताणलेले आहेत. अशा परिस्थितीत १९९५ नंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी आशा शंकरला आहे. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर खरंच शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद येणार का? आणि शंकरचा निर्धार पूर्ण होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दुसरीकडे, सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेचे संबंध ताणलेल्या अवस्थेत आहेत. युतीचा तिढा सोडवायचा असेल तर एकाला त्याग करावा लागेल, असा अनुभवी सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिलाय. पण आता हा त्याग करणार कोण? हा प्रश्न बाकी आहे. शिवसेना जागावाटपाबाबत एक पाऊलही मागे घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडलीय. विनाशकाले विपरित बुद्धी ही शिवसेनेची नाही तर भाजपाची अवस्था असल्याची टीकाही त्यांनी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर केलीय. शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतलेली नाही. युती असल्यानं चर्चा होऊ शकते असं शिवसेनेनं म्हटलंय. त्यामुळे यात कुठंही नरमाईची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं. शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या कुठल्याही प्रकारची बैठक तसंच चर्चा सुरू नसल्याची माहिती त्यांनी दिलीय.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावलीय. भाजपानं शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवणार आहे. अमित शाहांच्या मुंबईतल्या भेटीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपाचा शिवसेनेपुढे उपमुख्यमंत्रिपद आणि गेल्यावेळपेक्षा मंत्रिपदं वाढवून देण्याचा प्रस्ताव आहे.