मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक रंजक घडामोडी होताना दिसत आहेत. अशावेळी वंचित बहुजन आघाडीकडून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यालयीन सचिव रतन बनसोडे सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.
यामध्ये काही दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची गुप्त बैठक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडीकडून याविषयी शरद पवार यांना विचारणा करण्यात आली आहे. दिल्लीत अशी बैठक झाली होती का? झाली असेल तर या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? कोणत्या राष्ट्रीय मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली? जर या बैठकीत राष्ट्रहिताच्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसेल तर मग या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली? याचाही पवार यांनी खुलासा करावा अशी मागणी वंचित आघाडीने केली आहे.
सांगलीत पुन्हा राजकीय भूकंप, भाजप-शिवसेना देणार मोठा दणका
दरम्यान, शनिवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र सोडले. राज्यात वंचित बहुजन आघाडी नावाचा एक पक्ष उदयास आला असून त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत आहे. वंचित आघाडी हा पक्ष भाजपला फायदा करून देण्यासाठीच मैदानात उतरला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने वंचितपासून सावध व्हावे, असे आवाहनही पवार यांनी केले.