कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : गेली कित्येक दिवस कोविड-१९ प्रभावामुळे पिंपरी चिंचवड परगण्यात इतर राज्यांप्रमाणे वातावरण तसे भयभीतच आहे. दररोज वाढणारे कोविड रुग्ण यामुळे प्रजा चिंताग्रस्तच..याच चिंतेच्या वातावरणात एक आनंदाचा क्षण मात्र प्रजेने अनुभवला. पिंपरी चिंचवड परगणा राम अर्थात महेश आणि लक्ष्मण यांच्या मालकीचा. पण त्यांच्याच एवढे वर्चस्व पालिकेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या एका 'श्रावणा' चेही आहे. तत्कालीन महाराष्ट्र प्रमुख देव'इंद्र' यांनी खास नागपूरहून त्यांना पिंपरी चिंचवड कडे रवाना केलेले. त्यांचाच वाढदिवस आणि तोच हा आनंदचा क्षण..
.....पालिकेचे आयुक्तपद खरे तर काटेरी मुकुट. त्यात राम लक्ष्मणाच्या प्रभावात काम करायचे म्हणजे कोण संकट. छोटेसे काम झाले नाही तर थेट राम लक्ष्मणाला फोन करणारे त्यांचे शिलेदार....आमच्या राम लक्ष्मणापुढे तुझा टिकाव लागणार नाही असा आविर्भाव या शिलेदारांचा. पण त्यांचे ही मनावर न घेता या "श्रवणा'ने गेली जवळपास दोन तीन वर्ष हा काटेरी मुकुट इमाने इतबारे जपलाय.
खरे तर पिंपरी चिंचवड मध्ये राजे 'अजित' हद्दपार झाल्यानंतर देव'इंद्राने' परगण्याची सूत्रं राम लक्ष्मणाच्या हातात दिली होती तरी राम लक्ष्मणाचा वारू अगदीच चौफेर उधळू नये म्हणून त्यांनी 'श्रावणा'ला नागपूरहून आणलेले. पण 'देव'इंद्राची 'श्रावणा'कडून जी अपेक्षा होती त्याला तो मात्र खरा उतरू शकला नाही.
अर्थात भल्या भल्याना पोहचवलेल्या या 'गाव' वाल्यांपुढे त्याचा टिकाव लागणे तसे अवघडच. अगदी पहिल्याच वर्षात हद्दपार झालेल्या घड्याळ आणि बाणवाल्यानी त्यांना कमळाचा घरगडी करून टाकलं. पहिल्या वर्षातील लक्ष्मण अर्थात शंकर यांच्या चंद्ररंग महालातील नंदीने 'श्रावणा'ला मेसमराईज केले. तो म्हणेल तेच सत्य या मतापर्यंत 'श्रावण' पोहचला.. याच काळात पिंपरी चिंचवड परगण्यातील एकमेवादित्य थोर समाजसेवक मारोतरावांनी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या खालितांचा रतीब सुरु केला. पण त्याच मारोतीरावांना मी जर तिजोरीत गडबड केली असेल तर खुर्ची सोडतो असं सांगण्याचे धाडस 'श्रावणा'ने केले.
अर्थात श्रावणाने तिजोरीच्या रकमेत हेर फेर केला असं कोणीच छाती ठोक पणे म्हणणार नाही किंवा म्हणू शकणार नाही, पण परगण्यात राम लक्ष्मणाच्या शिलेदारांकडून होत असलेल्या राज्याच्या तिजोरीच्या लुटीकडे मात्र डोळेझाक करण्याचे पातक त्यांच्या माथी लागलंय हे मात्र खरे.
पहिल्या वर्षी नको तेवढे डोक्यावर घेतलेल्यानीच पलटवार करण्याचा क्षण ही 'श्रावणा'ने तसा अनुभवलाय. ही सर्व दु:ख पचवत असतानाच कोरोनाचे संकट आले आणि कधी ही आव्हानाला सामोरे न जात मधला मार्ग पत्करत पुढे जाणाऱ्या 'श्रावणा'ने, कोरोना मध्ये मात्र प्रजेची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बाजूच्याच पुण्यामध्ये जनता हवालदिल होत असताना या परगण्यात मात्र प्रजेला या संकटातून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न 'श्रावणा'ने केला. म्हणूनच त्यांच्या जन्म दिनाचा या नगरीला आनंद आहे. या नगरीचा सामान्य घटक म्हणून आमच्या ही त्यांना खूप शुभेच्छा...!
(पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त...!)