एसटी कर्मचारी आक्रमक, सरकारचा इशारा झुगारुन दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन

ST employees agitation news :एसटी कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरुच आहे.  

Updated: Oct 28, 2021, 10:31 AM IST
एसटी कर्मचारी आक्रमक, सरकारचा इशारा झुगारुन दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन
संग्रहित छाया

कोल्हापूर : ST employees agitation news :एसटी कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरुच आहे. (ST employees agitation)  त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी-जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर कल्याणच्या डेपोतून एकाही गाडीची वाहतूक झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

आमच्या मागण्या कायम आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, काल राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा देण्यात आला होता. जो आंदोलनात सहभागी होईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. असा इशारा देऊनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असल्याने काही एसटी आगारातील सर्व बस सेवा बंद आहेत. यामुळे या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. कल्याण, कोल्हापूरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरातील एसटी आगारातून जाणारी बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. 

परवहनमंत्री अनिल परब यांचे आवाहन

दरम्यान, परवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनेबरोबर चर्चा केली. त्यांच्या रास्त मागण्यांबाबत सकारात्मक आहोत. दिवाळीच्या आधी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही गोष्टी जाहीर केल्या जातील असे आश्वासन दिले. महागाई भत्ता 5 टक्के दिला आहे. घर भाडे भत्ता आणि इतर मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. मी त्यांना विनंती केली उपोषण मागे घ्यावे. आज एसटी महामंडळाची बैठक आहे त्यात काही मागण्यांवर चर्चा होईल, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने  28 टक्के महागाई भत्ता केला आहे. एसटी कर्मचार्‍यांना 12 टक्के महागाई भत्ता होता तो आम्ही  17 टक्के केला, त्यांना आता 28 टक्के वाढ हवी आहे. आर्थिक तरतुद करावी लागेल, त्यासाठी दिवाळीनंतर यावर निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांना दिलंय आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिले.