मुंबई : दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी रात्री अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला आहे.
गेल्या आठवडय़ापासूनच रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झालीय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भातही बहुतेक भागात किमान तापमान २ ते ४ अंशांनी वाढलं आहे. मुंबईसह कोकण विभागात मात्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे.
विदर्भात मात्र २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.